कोगनोळी : कोगनोळी येथील कोरोना तपासणी नाक्यास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (रेल्वे) भास्करराव यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. योग्य त्या सूचना देऊन तपासणी पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (रेल्वे) भास्कर राव यांची दोनच दिवसांपूर्वी कर्नाटक उत्तरच्या कोविड नियंत्रण विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बेळगाव, बागलकोट व विजापूर या तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील कोरोना तपासणी पथकास शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नाक्यावर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांच्याशी चर्चा करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करून त्यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेतला.
यावेळी त्यांनी दूधगंगा नदी येथील महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमांची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, पोलीस उपाधीक्षक मनोज कुमार नायक, पोलीस उपाधीक्षक (रेल्वे) हुबळी एन पुष्पलता, डी. बी. पाटील, निपाणी शहर पोलीस ठाण्याचे अनिल कुंभार, एस. ए. तोलगी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व्ही. एच. हुंडेकरी, आशा कार्यकर्त्या अश्विनी खोत, सुरेखा कागले, संगीता मंजूळकर यांच्यासह इतर पोलीस व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ : कर्नाटक राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (रेल्वे) यांनी कोगनोळी येथील कोरोना तपासणी पथकाच्या भेटीप्रसंगी वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेतला.