गणेश शिंदे ल्ल कोल्हापूरराज्यात झालेल्या निवासी, आंतरवासीयता वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महानगर असलेल्या शहरांना एप्रिलअखेर पहिल्या टप्प्यात जादा बंदूकधारी सुरक्षा रक्षक देण्यात आले आहेत. त्यात राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, धुळे या जिल्ह्णांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला (सीपीआर)एप्रिलअखेर जादा सुरक्षा रक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य शासनाने सीपीआरला जूनअखेर ५८ जादा बंदूकधारी सुरक्षा रक्षक देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आणखीन दोन महिने सीपीआर प्रशासनाला सुरक्षा रक्षकांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.गेल्या महिन्यात राज्यातील मुंबई (सायन), धुळे या ठिकाणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी व आंतरवासीयता वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडले होते. याविरोधात त्यांची शिखरसंस्था असलेल्या ‘मेडिकल असोसिएशन आॅफ रेसिडेन्स डॉक्टर ’अर्थात ‘मार्ड’ने आवाज उठवून राज्य शासनाला जाग आणली. त्याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०१७ अखेर राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरविण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते; पण,आता महिना संपायला अवघे तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरविणे अशक्य आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्याचे कारण सांगून पहिल्यांदा महानगरांमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुरक्षा रक्षक पुरवू,असे राज्य शासनाने सांगितले आहे. दरम्यान, कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात सध्या १९ ‘मेस्को’चे विनाबंदूकधारी सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी तीन महिला सुरक्षा रक्षक आहेत. प्रवीण दीक्षित यांची ‘विशेष नियुक्ती’गेल्या महिन्यात झालेल्या निवासी व आंतरवासीयता वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतर राज्य शासनाने राज्याचे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची विशेष नियुक्ती केली आहे. दीक्षित यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेचा आढावा घेऊन याचा अहवाल राज्य शासनाला त्यांना सादर करावयाचा आहे.सध्या राज्य शासनाकडे सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिलअखेर वैद्यकीय महाविद्यालयाला जादा सुरक्षा रक्षक मिळणार नाहीत. राज्य शासनाने जूनअखेर सुरक्षा रक्षक देऊ, असे सांगितले आहे.- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
सीपीआरला मिळणार जूनअखेर जादा सुरक्षारक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 12:52 AM