लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांसाठी संजीवनीचे काम करणाऱ्या सीपीआर रुग्णालयातील प्रसूती विभागात यावर्षी प्रथमच बेडचा तुटवडा नाही. शंभरावर बेड, डॉक्टर आणि नर्सेसची उपलब्धता आणि पाणी, जेवण अशा सोयीसुविधांमुळे येथे दाखल होणाऱ्या महिलांना गैरसोयींचा सामना करावा लागत नाही. मात्र, आता येथे स्वच्छतेची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले.
सीपीआरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह काही प्रमाणात सीमा भाग, कर्नाटक व कोकणातील गरोदर मातादेखील बाळंतपणासाठी दाखल होतात. याशिवाय सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हाॅस्पिटल या दोन शासकीय रुग्णालयांमध्येही प्रसूतीची सोय आहे. मात्र, या दोन्ही रुग्णालयांच्या व खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सीपीआरमध्ये प्रसूती होणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट, तिप्पट आहे. त्यामुळेच येथे अधिकाधिक वैद्यकीय सेवा सुश्रूषा व स्टाफची गरज असते. एक-दीड वर्षापूर्वीपर्यंत या विभागात अनेक गैरसोयींचा सामना करीत प्रसूती झालेल्या महिलांना राहावे लागायचे, बाळंत झालेल्या महिलांसाठी जमिनीवर गादी टाकून तेथे सोय केली जायची, स्टाफही कमी होता, आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे.
वर्षभरापूर्वी येथील इंडो काऊंट कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून प्रसूती विभागाला मोलाचे सहकार्य केले आहे. येथे त्यांनी बेड देऊन नवीन विभागच सुरू केला आहे. शिवाय नातेवाइकांना बसण्यासाठी, जेवणासाठी, आराम करण्यासाठी बाह्य परिसरात एक शेडही टाकून दिला आहे.
---
शंभर खाटांची सोय
सध्या सीपीआरमध्ये शंभर बेडची सोय असल्याने येथे प्रसूतीपूर्व उपचार घेत असलेल्या आणि प्रसूती झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मातांना पुरेसे बेड उपलब्ध आहेत. कोणत्याही महिलेला खाली झोपावे लागत नाही. नैसर्गिक प्रसूती झालेल्या महिलेला लवकर डिस्चार्ज मिळतो; पण सिझेरियन असेल तर आठ-दहा दिवस राहावे लागते. येथे महिलांसाठी बेडशीट, चादर अशा सगळ्या सुविधा आहेत.
--
महिन्याला पाचशेच्या वर प्रसूती
येथे दिवसाला किमान पाच-सहा महिलांची नैसर्गिक प्रसूती आणि दहा महिलांचे सिझेरियन होते, एवढ्या मोठ्या संख्येने प्रसूती होणारे हे जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय आहे. महिन्याला पाचशेच्या वर महिलांची येथे नोंद होते.
--
डॉक्टरांचे राऊंड, चहा आणि जेवण
लेबर विभागात २४ तास एक डॉक्टर असतात. शिवाय सकाळी आणि संध्याकाळी असा दोन वेळा डॉक्टरांचा राउंड होतो. नर्स आणि अन्य स्टाफही आता पुरेसा आहे.
रुग्णालयात महिलांना चहा, नाश्ता व जेवणाची आणि पाण्याचीही सोय आहे; पण बऱ्याचदा नातेवाईकच डबा आणि पाणी घेऊन येतात. या चांगल्या सोयी असताना येथे स्वच्छतेचा मात्र अभाव जाणवतो.
--
माझी येथे चार दिवसांपूर्वी नैसर्गिक प्रसूती झाली आहे. बेडसह अन्य सोयीसुविधा चांगल्या आहेत. स्वच्छतेचा मात्र अभाव आहे.
रूपाली कलकुटगी (कोल्हापूर)
---
मला तब्येतीचा त्रास जाणवत होता म्हणून प्रसूतीपूर्व उपचारासाठी दाखल झाले आहे. इथे चहा, जेवणाचीही सोय आहे; पण मला घरूनच डबा येतो. स्वच्छतागृह थोडे अस्वच्छ असतात.
(महिला)
---
फोटो नं ०२०३२०२१-कोल-सीपीआर डिलिव्हरी वॉर्ड
ओळ : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील प्रसूती विभागात मंगळवारी सिझेरियन वाॅर्डातील महिलांसाठी पुरेसे बेड उपलब्ध होते.