* 'लोकमत' इफेक्ट : कोरोना वाॅर्डात नातेवाइकांना मज्जाव
गडहिंग्लज : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी समर्पित येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांच्या वर्दळीमुळे कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी नातेवाइकांना रुग्णालयात मज्जाव करण्यात आला आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून रुग्णालयाच्या परिसरात वैद्यकीय सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
उपचारासाठी दाखल रुग्णांचे नातेवाईक चहा, नाष्टा, जेवण व विचारपूस करण्याच्या निमित्ताने रुग्णालयात सर्रास वावरत होते. बाधितांच्या संपर्कात जाऊन ते बाहेर इतरत्र फिरत असल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. त्या संदर्भात 'लोकमत'ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील चहाच्या टपरयादेखील हटविण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंना १०० मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावून अन्य वाहने व नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
वाहनांचे पार्किंगदेखील बाहेरच करण्यात आले आहे. केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि बॅरिकेड्सच्या ठिकाणी पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांना तैनात ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात केवळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जात आहे.
----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात १०० मीटर अंतरावर असा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसऱ्या छायाचित्रात कोविड केंद्रात रुग्णांच्या नातेवाइकांची वर्दळ बंद केल्याने आवारात अशी शांतता होती.
क्रमांक : २६०५२०२१-गड-०८/०९