कोल्हापूर : लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत संपल्यामुळे प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर महापालिकेत अधिकारीराज सुरू झाले. प्रशासकांनी काही तातडीने निर्णय घेतल्यानंतर त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. सर्वप्रथम महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या उत्तर बाजूस असणाऱ्या महापौर, उपमहापौर यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना बुधवारी कुलपे लावण्यात आली. तसेच नगरसचिव विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
महापालिकेच्या आयुक्त डॉ. बलकवडे यांनी सोमवारी (दि. १६) प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मंगळवारी मुख्य प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, महिला व बालकल्याण सभापती यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते यांच्या कार्यालयांना तत्काळ कुलपे लावण्याचे आदेश प्रशासक बलकवडे यांनी दिले होते. बुधवारी त्याची अंमलबजावणी झाली. कार्यालयांना नवीन कुलपे लावण्यात आली आहेत.
सर्वच पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला कर्मचाऱ्यांची नेमणूक नगरसचिव विभागातर्फे करण्यात येते. ज्या वेळी पदाधिकारी बदलतात आणि नवीन पदाधिकारी येईपर्यंत दहा-बारा दिवस कर्मचारी अक्षरश: त्याच कार्यालयात बसून काढतात. परंतु प्रशासक बलकवडे यांनी मात्र सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्या हुद्द्यानुसार यादी तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सुमारे ३६ ते ३७ कर्मचाऱ्यांची यादी बुधवारी तयार करून ती नगरसचिव सुनील बिद्रे यांनी कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्याकडे दिली.
या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने अन्य विभागांत सामावून घेण्यात येणार आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आज, गुरुवारपासून त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे. यापुढे नगरसचिव कार्यालयात चार ते पाच कर्मचारी राहतील.महापालिका चौकात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून त्याची अंमलबजावणीही बुधवारपासून सुरू झाली. बुधवारी मोजकीच वाहने चौकात लावण्यात आली होती. त्यामुळे चौक सुनासुना वाटत होता.वशिलेबहाद्दरांच्या बदल्याकोणत्याही पदाधिकाऱ्यांकडे स्वीय सहायक, क्लार्क, शिपाई, पहारेकरी म्हणून काम करण्यासाठी अनेकांची धडपड असते. वशिले लावून आपल्या नेमणुका कर्मचारी करून घेतात. काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलावर, एकाच कार्यालयात काम करीत आहेत. त्यांना आता दुसऱ्या विभागात जाऊन काम करावे लागणार आहे.