कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात परिनियम व विनिनियमाचे निदेश पुस्तक वारंवार मागणी करूनही दिले जात नाही. १९९४ पासून विद्यापीठ प्रशासनाने हे पुस्तकच तयार केले नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन कोणत्या आधारे कामकाज करत आहे, असा सवाल करत अधिसभा सदस्यांनी शुक्रवारी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. हे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध असल्याची सारवासारव विद्यापीठाने केली मात्र, उपलब्ध निदेश पुस्तक राज्य सरकारचे असून त्यावर केवळ विद्यापीठाचा लाेगो लावला असल्याचे सांगत सदस्य ॲड. अभिषेक मिठारी यांनी प्रशासनाची कोंडी केली. विद्यापीठाची अधिसभा राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के होते.सुरुवातीलाच निदेश पुस्तिकेवरून ॲड. मिठारी यांनी प्रशासनाला जाब विचारला. निदेश पुस्तिकेसाठी २७ वेळा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. यासाठी वारंवार निवेदने दिली. मात्र, तरीही ही पुस्तिका छापील स्वरूपात दिलेली नाही. ही पुस्तिका नसेल तर प्रशासन कोणत्या आधारे कामकाज करते? ही पुस्तिका उपलब्ध न केल्याने संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी मिठारी यांनी केली. सदस्य अजित जाधव, मनोज गुजर, श्वेता परूळेकर, डी.एन.पाटील यांनीही या विषयावर प्रशासनाला जाब विचारला. यावर डॉ. व्ही.एम. पाटील यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पुस्तिका उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, संकेतस्थळावरील पुस्तिका राज्य सरकारची असल्याचे सांगत प्रशासन सदस्यांना फसवत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अधिसभा सदस्य आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
नियमावली पुस्तिकेवरून गाजली शिवाजी विद्यापीठाची अधिसभा
By पोपट केशव पवार | Published: December 22, 2023 6:01 PM