Aditya Thackeray challenges Eknath Shinde Group: लोकमत न्यूज नेटवर्क, आजरा: गद्दार आमदार व खासदार यांनी हिंमत असेल तर राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जावे, असे खुलं आव्हान शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ते आजऱ्यातील सभेत बोलत होते. एकीकडे शिवसेनेला गळती लागलेली असताना आजच्या सभेत मात्र मुस्लीम समाजातील तरुणांनी शिवसेनेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
आदित्य ठाकरे यांचे आजरा नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दम भरला. "शिवसेनेने गद्दारांना राजकीय ओळख दिली, तिकीट दिले, निवडून आणले. मात्र यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ४० आमदारांनी सुरतेला पळून जाऊन उठाव नव्हे तर गद्दारीच केली. आत्ताचे गद्दारांचे सरकार बेकायदेशीर व घटनाबाह्य असून सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहा व या पुढील काळात गद्दारांना धडा शिकवा", असेही आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले.
"आमदार प्रकाश आबीटकर यांना ५६७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यांच्यासह सर्व आमदारांवर डोळे बंद करून विश्वास ठेवला. तरीही प्रकाश आबीटकर यांनी केलेल्या कृत्यावर विश्वास बसत नाही", असे आदित्य ठाकरे म्हणाले. या सभेला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, आदेश बांदेकर, विजय देवणे, संभाजी पाटील, युवराज पोवार, राजेंद्र सावंत, डॉ. सतीश नरसिंह, रियाज शमनजी, प्रभाकर खांडेकर, ओंकार माद्याळकर यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
आजऱ्यातील सभेवेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते. वारंवार घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. 'गद्दारांबाबत फक्त आदेश द्या, आम्ही त्यांची जागा दाखवितो', असे शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांना सांगितले. यावेळी ठाकरे भावनाविवश झाले व त्यांनी शिवसैनिक दयानंद भोपळे यांना मिठी मारून लढण्याचे बळ दिले.