शिवाजी सावंत गारगोटी: अमेरिकास्थित जगातील नामवंत स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी भुदरगड तालुक्यातील सतरा वर्षीय विद्यार्थ्याची निवड झाली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या विद्यापिठात निवड होणारा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. गारगोटी येथील आदित्य विक्रम नलवडे (वय १७) याची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठात "अंडर ग्रॅज्युएट कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रॅमसाठी" निवड झाली आहे. चार वर्षांसाठी एकूण शैक्षणिक शुल्क ९८ टक्के माफ आहे. जून २०२३ मध्ये त्याने याबाबतच्या ऑनलाईन दिलेल्या परिक्षेत त्याला ९९ टक्के गुण मिळाले होते. आदित्यचे वडील सैन्य दलात अधिकारी तर आई अश्विनी या गृहिणी आहेत. आदित्यचे संपूर्ण शिक्षण सैनिक शाळेत झाले आहे. जम्मू काश्मिर,अंदमान, गुजरात, अरुणाचल प्रदेश, पंजाब, पुणे येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्याने शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. त्याने कोणतीही खासगी शिकवणी, शैक्षणिक मार्गदर्शन न घेता स्वत:च्या ज्ञानावर हे यश मिळवले आहे. याच सोबत मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत व पाली भाषा अवगत आहेत. आतापर्यंत त्याने सुमारे एक हजार पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयावर तो एक तास व्याख्यान देऊ शकतो. त्याने ‘ब्लॉकचेन’ या कार्पोरेट कंपन्यांशी संबंधीत दहावी पासूनच ऑनलाईन काम केले आहे. कंपन्यांना ब्लॉग लिहून देणे, मार्गदर्शन करणे अशी ऑनलाईन कामे करून त्याने स्वत:चा रोजगार निर्माण केला. तो बास्केट बॉलचा उत्तम खेळाडू असून त्याला सामाजिक उपक्रमांची, जनावरांची आवड आहे.वृध्दांना मदत,व्यायाम व व्यासंगी आदित्यची ग्रहणशक्ती अफाट आहे.कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठ हे ८ हजार १८० एकरात असून येथे राहणे, जेवण याची पंचतारांकीत सोय आहे.आदित्यला शिक्षणासह पुस्तके सुध्दा माफ केलेल्या शिष्यवृत्तीतून दिली जाणार आहेत. या विद्यापीठात उद्योगपती मुकेश अंबानी, इलॉन मस्क, रतन टाटा, अजिज प्रेमजी, ऋषी सुनक, अक्षता मूर्ती अशा दिग्गजांनी शिक्षण घेतले आहे. आदित्य सप्टेंबरमध्ये शिकण्यासाठी अमेरिकेला जाणार आहे.
मला वाटतं मोबाईलवर चांगलं - वाईट दोन्ही प्रकारचं ज्ञान मिळते परंतु माहिती व नवनवीन शिकण्यासाठी सर्वांनी मोबाईलकडे बघितले पाहिजे. ऑनलाईन पुस्तके,वाचन,लिहिणे,माहिती मिळवणे,नवनविन कौशल्ये शिकणे मोबाईलमुळे सहज शक्य आहे.गेम व इन्स्टा रिलमध्ये आजच्या मुलांनी फुकट वेळ वाया घालवू नये. - आदित्य विक्रम नलवडे (विद्यार्थी, स्टैनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया)