विश्वास पाटील
कोल्हापूर : शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील दौऱ्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडूनच नव्हे तर सामान्य जनसमुदायांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता बंडखोरी करून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या पोटात गोळा आल्याचे चित्र आहे. आजरा, कोल्हापूरातील मिरजकर तिकटी व जयसिंगपूर येथे त्यांच्या सभा झाल्या. तेथील एकूण प्रतिसाद त्यांचा उत्साह वाढवणारा होता. निवडणूकांना अजून दोन वर्षांचा अवधी आहे. ही उर्जा तोपर्यंत लोकांत टिकणार का हीच खरी उत्सुकता आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार राज्यातील सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिवसेनेबध्दल एकही गोष्ट चांगली झालेली नाही. रोज एक धक्का त्या पक्षाला बसला आहे. आताही १६ आमदारांच्याबाबतीत काय निर्णय होणार ही उत्सुकता आहे. परंतू तो निर्णय पुढे ढकलला जात आहे. हा निर्णय कदाचित बंडखोर आमदारांच्या विरोधात जावू शकतो म्हणून राज्यमंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची दुसऱ्या टप्प्यातील शिवसेना निष्ठा रॅली कोकणातून सुरु झाली. ती सोमवारी आजरा येथे आली. सायंकाळी मिरजकर तिकटीला सभा झाली. मंगळवारी जयसिंगपूरला सभा घेवून ती रॅली पाटणकडे रवाना झाली. या रॅलीमागे दोन प्रमुख हेतू होते. पक्षातील ४० आमदार व १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यावर मोडलेल्या संघटनेला आणि सामान्य कार्यकर्त्याला नव्याने आधार देणे व त्याला राजकीय लढाईसाठी चार्ज करणे आणि खरी शिवसेना आपलीच आहे यासाठीचा मासबेस तयार करणे. ठाकरे यांच्या या रॅलीस सर्वत्र मिळालेला किंवा मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यात हे दोन्ही हेतू सफल होत असल्याचे चित्र दिसून आले.
आजरा येथील सभेला प्रचंड गर्दी होती. तिथे मुळातच भगव्या विचारांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्तच प्रतिसाद तिथे लाभला. ठाकरे यांनी बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना किती विकास निधी दिला याची यादीच वाचून दाखवली. कोल्हापूरातील तिन्ही सभेत बंडखोर आमदार-खासदारांच्या विरोधात लोकांनी त्वेषाने घोषणा दिल्या. सगळीकडेच त्यांचा गद्दार असाच नामोल्लेख झाला व त्यावर जनतेनेही शिक्कामोर्तब केले. आजऱ्यात मुस्लीम समाजातील शंभरहून जास्त तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. जयसिंगपूरमध्ये रहिम पठाण या कार्यकर्त्यानेही सभेतच शिरोळचा पुढचा आमदार शिवसेनेचाच अशी आरोळी दिली. ठाकरे यांनी त्याला स्टेजवर बोलवून घेवून मिठ्ठी मारली. तिथे शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस एकत्र आली आहेच. हीच मोट कायम राहिली तर वेगळे चित्र पाहायला मिळू शकते याचीच चुणूक मंगळवारच्या सभेत पाहायला मिळाली.
जनसमुदायांत उत्सुकता..
तिन्ही सभांना शिवसेनेच्या कडव्या कार्यकर्त्यांशिवायही सामान्य जनसमुदाय उपस्थित होता. सभेला गर्दी करण्यासाठी गाड्या भरून आणलेली जनता नव्हती. आदित्य घडलेल्या घटनांबध्दल काय बोलतात याबध्दल लोकांत उत्सुकता दिसून आली. दोन्ही काँग्रेससह भाजपच्या नेत्यांचेही या सभांकडे, त्यास मिळणाऱ्या प्रतिसादाकडे लक्ष होते. वेगळे चित्र..
ठाकरे यांच्या दौऱ्यास मुस्लीम समाजातूनही मुख्यत: तरूण कार्यकर्त्यांतून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले. भाजपच्या विरोधातील हा वर्ग दोन्ही काँग्रेसऐवजी शिवसेनेकडे नव्या आशेने पाहत असल्याचे दिसत आहे. जातीय धुव्रीकरणाच्या राजकारणांवर भाजपचा सगळा रोख आहे. त्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाज शिवसेनेच्या पाठिशी उभा राहत असेल तर त्यातून महाराष्ट्रात वेगळेच चित्र तयार होवू शकते.
कार्यकर्त्यांना बळ..
मराठवाड्यानंतर शिवसेनेला सगळ्यात मोठा हादरा पश्चिम महाराष्ट्रात बसला. एकतर दोन्ही काँग्रेसच्या या गडामध्ये शिवसेनेला कमी जागा मिळाल्या परंतू जे निवडून आले ते सगळेच विरोधात गेल्याने पक्षापुढे अस्तित्वाचा प्रश्र्न तयार झाला. त्यामुळे जे आपल्या सोबत आहेत, त्यांना बळ देण्यात कांही प्रमाणात का असेना हा दौरा निश्चितच यशस्वी झाला.