कोल्हापूर, दि. १९ : ऐन दिवाळीत एस.टी.च्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि खासगी वाहतूकदारांच्या मदतीने बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पाठविण्यात आले. संपाच्या तिसऱ्याही दिवशी संघटना आंदोलनासाठी ठाम राहिल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सुरू असणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्याच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाहण्यास मिळाले. प्रवाशांचे हाल कमी होण्यासाठी सरकारतर्फे संपकाळात खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर जवळपास ५० खासगी वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू करण्यात आली.
यामध्ये गडहिंग्लज, इचलकरंजी, निपाणी, शाहूवाडी, बांबवडे, चंदगड यांसह कणकवली, कुडाळ, रत्नागिरी, पुणे, सांगली, आदी महत्त्वाच्या मार्गांवर वाहने सोडण्यात येत होती. प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्याची सोय केल्याने प्रवाशांमधून प्रशासनाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत होते.
कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून आर. टी. ओ. अधिकारी व पोलिसांची या ठिकाणी गस्त सुरू होती. एस. टी.च्या नियमित दराच्या जवळपासच दराने ही वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय टळत होती. अनेकांना बसगाड्यांच्या संपाची माहिती असल्याने ते बसस्थानकाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे संभाजीनगर आणि गंगावेश बसस्थानकांवर प्रवाशांची तुरळक गर्दी होती.
एस.टी. महामंडळाच्या वतीने केल्या उपाययोजना
- विभागीय कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्ष सुरू
- प्रत्येक डेपोत एस. टी.चा एक पालक अधिकारी तैनात
- प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानकाबाहेर खासगी वाहने तैनात केली.
कोल्हापूर विभागातील दृष्टिक्षेप
- कोल्हापूर विभागातील गाड्या - ८९०
- एकूण आगारे - १२
- फेºया - २ लाख ७० हजार किलोमीटर
- दररोजचे प्रवाशी - ४ लाख २५ हजार
- दररोजचे उत्पन्न - सुमारे ७० लांख
तुरुंगवास आणि दंडराज्य सरकारने एस. टी. महामंडळास ‘लोकोपयोगी सेवा’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे संप केल्यास तुरुंगवास व दंडाची तरतूद आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत हजर राहण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या हाती हे परिपत्रक पडले नाही.
या परिपत्रकानुसार औद्योगिक विवाद अधिनियम १९४७, कलम २२ नुसार समेटाची कारवाई सुरू असताना संपात सहभागी झाल्यास एक महिना तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याचप्रमाणे कराराचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यास सहा महिने शिक्षा व प्रतिदिनी रु. २०० दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली.
आरक्षणाच्या तिकिटाचे पैसे मिळणारसंपकाळात ज्या प्रवाशांनी आॅनलाईन तिकीट बुक केले आहे, त्या प्रवाशांच्या तिकिटाच्या परताव्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबत सूचना वरिष्ठ पातळीवर सर्व आगारांत देण्यात आली आहे. यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तसेच तिकीट खिडक्यांवर आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिथे गेल्यावर संपूर्ण रकमेचा परतावा मिळणार आहे.
व्यवसाय ठप्प...ऐन दिवाळीतील राज्यस्तरीय पुकारलेल्या संपाचा फटका कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकासह सर्व आगारांतील लहान-मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. संपामुळे आगारासह बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारे सरबत विक्रेते, पुस्तके विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, फळविक्रेते, मोबाईल रिचार्ज करणारे, गजरे विक्रेत्यांसह चप्पल-बूट पॉलिश करणाऱ्या सर्वांना यांचा फटका बसला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत संपामुळे आमच्यावर शिमगा करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया या छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली.