या प्रकारामुळे आरोग्य विभागाची निष्क्रियता स्पष्ट झाली आहे. कोल्हापूर शहरातील एक महिला रुग्ण कोरोनाबाधित असल्याने त्यांना दि. २६ मे रोजी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यातील काही वेगळी लक्षणे दिसताच दि. २८ मे रोजी त्यांचा पुन्हा स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर हा कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी गेला; परंतु त्याच्या दुसऱ्या स्वॅबचा अहवाल तब्बल सव्वा दोन महिन्यांनी उपलब्ध झाला. या रुग्णास डेल्टा प्लस व्हायरस असल्याचे त्यात नमूद केले होते.
दि. २८ मे ते दि. ८ ऑगस्ट या काळात या रुग्णाला डेल्टा प्लस व्हायरस असल्याची कसलीच माहिती कोणाला नव्हती. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा आरोग्य विभागातील सावळ्या गोंधळावर प्रकाशझोत पडला आहे. एकीकडे चाचण्या वाढवा, अहवाल लवकर द्या, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात असताना दुसरीकडे दोन महिन्याहून अधिक काळ अहवाल प्रलंबित राहतो, पण त्याचा कोणी पाठपुरावा करत नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यास छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले गेले. त्याचा अहवाल मिळताच महापालिकेच्या पथकांनी तो रहात असलेल्या परिसरातील सहव्याधी रुग्णांची तपासणी केली, तसेच नजीकच्या सहवासातील १३ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी तिघे बाधित आढळले. सर्वांवर उपचार झाल्यानंतर कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
- प्रशासनाचे वरातीमागून घोडे -
संबंधित महिला कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळताच प्रोटोकॉलप्रमाणे महापालिका प्रशासनाने पुढील कार्यवाही केली; परंतु दुसऱ्या स्वॅबचा अहवाल इतक्या उशिरा का आला याचे स्पष्टीकरण देण्यात आलेली नाही. एखादा रुग्ण डेल्टा प्लस व्हायरसचा असतो, पण त्याची माहिती प्रशासनाच्या हातात नसते. सव्वादोन महिन्यांनी अहवाल येतो आणि मग प्रशासनाचे घोडे वरातीमागून धावते असेच वास्तव या प्रकारातून पुढे आले आहे.