कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिर गाभारा प्रवेशप्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आदेश शनिवारी सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पी. पी. शर्मा यांनी दिले. याप्रश्नी कोणाला म्हणणे दाखल करायचे असल्यास त्यांनी म्हणणे दाखल करावे, असे सांगून त्याची पुढील सुनावणी सोमवारी (दि. २५) होणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. वादी व प्रतिवादी यांच्या वकिलांनी सुमारे दोन तास शर्मा यांच्यासमोर युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयात सुनावणीवेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी हजर राहिले होते. गाभाऱ्यात पुजारी व त्यांचे सहाय्यकांच्या व्यतिरिक्त स्त्री अथवा पुरुष अशा कोणालाच प्रवेश देऊ नये, अशा आशयाची मागणी करणारा दावा भक्त व श्रीपूजक यांच्यावतीने गजानन विश्वनाथ मुनिश्वर व भक्त शिवकुमार शंकर शिंदे यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना शनिवारी समक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते पण, शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्यावतीने करवीर तहसीलदार योगेश खरमाटे व देशपांडे यांच्यावतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते हे दोघे हजर राहिले. वादी यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालक म्हणून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व पुरातत्व विभागास प्रतिवादी केले आहे. शनिवारी दुपारी प्रतिवादी यांच्यावतीने सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी, आजच सकाळी समन्स मिळाले आहे. तिची कागदपत्रे मी वाचलेली नाहीत. त्यामुळे यावर म्हणणे कसे मांडणार, असा युक्तिवाद न्यायालयात मांडला. त्यानंतर वादी यांच्यावतीने अॅड. नरेंद्र गांधी यांनी, सन २०११ ला तत्कालीन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी श्री अंबाबाई देवी मंदिर गाभाऱ्याप्रश्नी अहवाल दिला आहे. या अहवालात सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दर्शन मिळावे, म्हटले होते; पण, त्यांच्यामुळे सर्वांना मुक्त दर्शन मिळत नव्हते. त्यामुळे मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता त्याला तूर्त मनाई मिळावी, असा युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पी. पी. शर्मा यांनी, अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेश हा भाविकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आदेश दिले. यावेळी न्यायालयात अॅड. अजित मोहिते, अॅड. ओंकार गांधी यांच्यासह अ. भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई आदी उपस्थित होते. प्रतिवादींचे दावे दाखल... अंबाबाई देवी मंदिर गाभाऱ्याप्रश्नी शनिवारी दोन प्रतिवादी यांनी दावे न्यायालयात दाखल झाले. क्षत्रिय मराठा महासंघ, वसंत मुळीक, इंद्रजित सावंत आणि दिलीप देसाई यांनी दावे दाखल केले. मुळीक व सावंत यांच्याकडून अॅड. अजित मोहिते यांनी काम पाहिले. अॅड. मोहिते यांनी, अंबाबाई मंदिर गाभाऱ्यात श्री पूजक व मदतनीसांनाच प्रवेश मिळावा या वादी यांच्या दाव्यावर हरकत घेत, सर्वांना गाभारा प्रवेश मिळावा, अशी विनंती केली. त्यावर न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. त्यानंतर प्रतिवादी दिलीप देसाई यांनीही, शर्मा यांच्या न्यायालयात यासंबंधीची कागदपत्रे सादर केली. (प्रतिनिधी)
प्रशासनाने कायदा, सुव्यवस्था राखावी
By admin | Published: April 17, 2016 12:36 AM