कोल्हापूर : कोल्हापुरात उभारल्या जाणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरसाठी २५२.१६ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार नियोजन विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे या योजनेअंतर्गत दि. ०८ जानेवारी २०२५ रोजी ५० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.कोल्हापूर जिल्हा सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सीमा भागाशी निगडित आहे. कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, जिल्ह्यात इंजिनिअरिंग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, बार कौन्सिल अशा विविध संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत; परंतु विविध संघटनांच्या सामूहिक बैठका, विचारांची-सांस्कृतिक देवाणघेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही.म्हणून जिल्ह्यात आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर निर्मिती करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती, तसेच त्यासाठी सातत्याने पाठपुरावादेखील केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती.
- दि.०९ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
- याबाबत शिंदे यांचे नियोजन विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश
- राजाराम तलावाच्या बाजूला दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटरचा प्रस्ताव सादर
- अर्थसंकल्पात अजित पवार यांच्याकडून कन्व्हेन्शन सेंटरसाठी निधीची तरतूद