बाजीराव जठारवाघापूर: महाराष्ट्र तसेच कर्नाटक, आंध्र, गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरु बाळूमामा देवालय या मंदिराचे विश्वस्त मंडळ अखेर धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी सोमवारी बरखास्त केले. याठिकाणी तीन सदस्यीय समितीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शिवराज नाईकवाडे यांची अध्यक्षपदी तर सदस्यपदी धर्मादाय निरीक्षक एम. के. नाईक आणि धर्मादाय निरीक्षक सत्यनारायण शेणॉय यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. काल, मंगळवारी (दि.२५) समितीने आपला कार्यभार स्वीकारला.बाळूमामा देवस्थान समितीच्या अधिकार पदाच्या कारणावरून गेले अनेक दिवस समिती सदस्यांमध्ये वाद सुरू होता. कोल्हापूर येथे या वादाचे पर्यावसन झाले होते. यानंतर आपणच देवालयाचे अधिकृत विश्वस्त असे दोन्हीकडून दावे करण्यात आले होते. या दाव्यापूर्वी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी देवस्थानवर समितीवर आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. प्रवीण पाटील (बिद्री), रवींद्र पाटील ( फये) हनुमंत पाटील ( आकुर्डे) यांनी याचिका दाखल केली होती.या याचिकेवर विश्वस्त मंडळावर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून विश्वस्त मंडळ बरखास्त केले. विद्यमान ट्रस्टमधील ११ जणांना बरखास्त केले असून उर्वरित दोन जणांना कायम ठेवले आहे. मात्र, कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.या तीन समितीचे सदस्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, इंद्रजीत खर्डेकर, नामदेव पाटील, एस. पी. पाटील, संदीप कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी बाळूमामाच्या मंदिर विकासासाठी व भक्तांच्या सेवेसाठी आपण सहकार्य करू अशी भूमिका यावेळी व्यक्त केली. नव्या तीन समितीच्या सदस्यांनी प्रत्येक विभागणीहाय कामकाजाचा आढावा घेण्याची सुरुवात केली आहे. आढावा घेतल्यानंतर यामध्ये असणाऱ्या त्रुटी आपण समोर ठेवून त्यामध्ये सुधारणा करून कामकाज केले जाईल, आदमापूर ग्रामस्थांच्या सहकार्याने इथून पुढे कामकाज पाहिले जाणार आहे. सोमवारी नियुक्तीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर मंदिराची सर्व ऑफिस कुलूप बंद होती. त्यामुळे आपण ते सील करण्याचे काम केले. आज पुन्हा माहिती घेऊन खुली करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व बाळूमामाच्या भक्तांना सर्व सेवा सुविधा चांगल्या पद्धतीने कशा मिळतील यासाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रशासकीय अध्यक्ष शिवराज नायकवडे यांनी यावेळी सांगितले.अकरा जणांवर बरखास्तीची कारवाईएकूण २१ सदस्य असणाऱ्या या ट्रस्टीपैकी धैर्यशील भोसले (अध्यक्ष), राजाराम मगदूम (मयत), रावसाहेब कोणकेरी (सचिव), गोंविद पाटील, शिवाजी मोरे, पुंडलिक होसमणी, लक्ष्मण होडगे, तमन्ना मासरेडी, भिकाजी शिणगारे, रामांना मुरेगूद्री, सिद्धाप्पा सुरानवर, आप्पासाहेब पुजारी या अकरा जणांवर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर सरपंच ग्रामपंचायत आदमापूर, पोलीस पाटील आदमापूर यांना कायम ठेवण्यात आले असून कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ट्रस्टींना धर्मादाय आयुक्तांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याने त्यांनाही कामकाजात भाग घेता येणार नाही.
बाळूमामा देवालयाचा कार्यभार प्रशासकीय समितीने स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:10 PM