कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, जयसिंगपूर व गडहिंग्लज बाजार समित्यांवर आज, सोमवारी सहायक निबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. गेली पाच महिने अशासकीय मंडळाची मुदत संपल्यापासून सचिवांवरच कारभार सुरु होता. या तिन्ही बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत सप्टेंबर २०२० ला संपली आहे. त्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने अशासकीय मंडळाची नेमणूक केली होती.
मात्र २३ एप्रिल २०२२ ला अशासकीय मंडळाची मुदत संपल्यानंतर सरकारने मुदतवाढी बाबत कोणताच आदेश काढला नाही. त्यामुळे गेली पाच महिने सचिवांवर समित्यांचा कारभार सुरु होता. अशासकीय मंडळाची मुदत संपल्यानंतर दोन महिने तर कामकाज पुर्णपणे ठप्प होते.
कामगारांचे पगार थांबले होते, अखेर जिल्हा उपनिबंधकांनी पगार देण्याबाबत आदेश दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. आता कोल्हापूर बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून शहर उपनिबंधक प्रकाश जगताप तर सदस्य म्हणून कार्यालय अधीक्षक श्रेणी-१ मिलींद ओतारी व लेखापरिक्षक श्रेणी -२ बाजीराव जाधव यांची नेमणूक केली आहे. जयसिंगपूर बाजार समितीसाठी शिरोळचे सहायक निंबधक प्रेम राठोड तर गडहिंग्लज बाजार समितीसाठी गडहिंग्लजचे सहायक निबंधक अमित गराडे यांची नेमणूक जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केली.