सुहास जाधव -पेठवडगाव -वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची अखेरीस प्रारूप मतदार यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी प्रसिद्ध केली. यासाठी प्रारूप अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर काम पाहत आहेत.वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २० मे २००८ ला झाली होती. या संचालक मंडळाची मुदत १९ मे २०१३ पर्यंत होती. त्यांना दोनवेळा सहा-सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर बाजार समितीवर इतिहासात प्रथमच मुदत संपल्यामुळे प्रशासकीय कारकीर्द १२ नोव्हेंबर २०१४ पासून सुरू झाली होती.वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुका आहे. बाजार समितीची निवडणूक पाच गटांत होणार आहे. या मतदारसंघानुसार प्रारूप मतदार यादी रविवारी (दि. १७) जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केली. त्यानुसार सहकारी संस्था विकास मतदारसंघात ११ जागा आहेत. यामध्ये १३४ विकास संस्थांतील १७३४ मतदार आहेत. ६२ ग्रामपंचायतींमध्ये चार जागा आहेत, यामध्ये ८०२ मतदार आहेत. अडते-व्यापारी गटासाठी दोन जागा असून, २०६९ व्यापारी मतदार आहेत. हमाल-तोलाई गटासाठी एक जागा असून, ४७ मतदार आहेत, अशी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर हरकत दाखल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्याकडे १६ ते २५ मे २०१५ पर्यंत, तर त्यावर निर्णय ८ जून २०१५ पर्यंत होणार आहे. १२ जून २०१५ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे १७ जुलैपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे.सध्या सहा महिन्यांपासून बाजार समितीवर प्रशासकराज आहे. अखेर बाजार समितीची रखडलेली यादी जाहीर झाल्यामुळे दोन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रशासकांची मुदत संपणार आहे.सहकारमंत्र्यांचे दुर्लक्षबाजार समिती कायद्यानुसार सहा-सहा महिन्यांच्या मुदतवाढ संचालक मंडळाला मिळाल्या होत्या. याचे आदेश काढून शासनाने पालन केले होते. मात्र, प्रशासकराज सहा महिन्यांची मुदत संपून सुद्धा कोणतीही अधिसूचना प्रसिद्ध न करता पदभार पाहत आहेत. या वैधानिक कृतीकडे सहकारमंत्र्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.
पेठवडगाव बाजार समितीमधील ‘प्रशासकराज’ संपणार
By admin | Published: May 19, 2015 9:33 PM