कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने संघावर लवकरच प्रशासक नियुक्तीची कारवाई होणार आहे. संघाचे संचालक अपात्र, निधन व राजीनामे झाल्याने सत्तारुढ गटासमोर अडचणी वाढल्या आहेत.
शेतकरी संघाचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कदम, मानसिंगराव जाधव व विजयादेवी राणे यांनी गुरुवारी राजीनामे दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत तीन अपात्र व पाच संचालक मयत झाल्याने संचालक मंडळ अल्पमतात आले आहे. संचालक मंडळातील १९ पैकी ११ जागा रिक्त झाल्याने कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त होऊ शकतो. शेतकरी संघावर सर्व पक्षीय सत्ता आहे, गेल्या तीन-चार वर्षांत संघाचा कारभार चांगलाच चर्चेत राहिला. कारभारी संचालकांना चार ज्येष्ठ संचालकांनी नेहमी विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर त्यांनी सगळे निर्णय घेतले.
संघाच्या प्रशासनाने तीन संचालकांचे राजीनामे स्वीकारलेले नाहीत. संचालकांनी राजीनाम्याची प्रत जिल्हा उपनिबंधकांकडेही दिल्याने कायदेशीरदृष्ट्या राजीनामे मंजूर झाल्याचे मानले जाते.
संघाकडून कायदेशीर बाबींची चाचपणी
संचालक मंडळ अल्पमतात आल्याने सत्तारुढ गट हादरला आहे. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन त्यातून काही मार्ग काढता येतो का? याची चाचपणी सुरु केली आहे.