कोल्हापूर : शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार महापालिकेने टॉप १० प्रभाग संवेदनशील निश्चित केले आहे. येथे महापालिकेतर्फे तीने विशेष कॅम्पद्वारे कोरोना तपासणी केली जात आहे. बुधवारी सकाळी मरगाई गल्ली येथे विशेष कॅम्पच्या ठिकाणी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून सर्दी, खोकला तापाची काही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी पुढे यावे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दैनंदिन होणाऱ्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सर्व्हेमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास त्या सर्वांचे स्वॅब घ्यावेत, अशी सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपआयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता भिसे, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत, आरोग्य निरीक्षक ऋषीकेष सरनाईक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : ०९०६२०२१-कोल- भेट
कोल्हापुरातील मरगाई गल्लीतील कोरोना रुग्णांच्या विशेष कॅम्पच्या ठिकाणी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.