राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर ; शेतकरी संघाचे पाच संचालकाचे निधन तर तीन संचालक अपात्र ठरले असून दोन संचालक गेली दीड वर्षे संघाच्या कामकाजात भागच घेत नाहीत. त्यामुळे संघाचे संचालक मंडळच अल्पमतात आल्याने प्रशासक नेमण्याबाबत सहकार विभागात हालचाली गतिमान झाल्या आहेत.
शेतकरी संघाची २०१५-१६ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनसुराज्य पक्षाने सत्ता कायम राखली. संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात कारभारात सुधारणा झाल्या, मात्र त्यानंतर हळूहळू चुकीचा कारभार चर्चेत राहिला. गेली पाच वर्षे शाखांतील अपहाराने संचालकांच्या विश्वासार्तसमोर प्रश्न निर्माण झाला. एकीकडे अपहाराचा विषय असताना युवराज पाटील, एम. एम. पाटील, मानसिंग पाटील यांना भूविकास बँकेच्या थकबाकीपोटी सहकार विभागाने अपात्र ठरवल्याने अठरा पैकी १५ जणांचे संचालक मंडळ राहिले. त्याचबरोबर गेल्या चार वर्षात दिलीपसिंह पाटील, सुमित्रादेवी शामराव शिंदे, शोभनादेवी नेसरीकर, शांताप्पाण्णा चौगले व बाबासाहेब पाटील-भुयेकर या पाच संचालकांचे निधन झाले. त्यामुळे सध्या कागदोपत्री दहा संचालक असले तरी दोन ज्येष्ठ संचालक गेली वर्ष-दीड वर्ष संघाच्या कारभारातच भाग घेत नाहीत. एक ज्येष्ठ संचालक गेली दोन महिने संघाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने संघावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सहकार विभागात सुुरू झाल्या आहेत. संघाच्या कारभाराने नेत्यांचीही बदनामी झाल्याने येथे प्रशासक आणून कारभाराला शिस्त लावण्याबाबत नेत्यांच्या पातळीवरही विचार सुरु आहे.
कारवाई करता येईना
सलग तीन संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक अनुपस्थित राहिला तर त्याचे पद अपोआपच रद्द होते. सहकार नियमानुसार दोन संचालक अपात्र ठरत आहेत, विशेष म्हणजे ते विरोधी संचालक असतानाही अल्प मताच्या भितीने सत्तारुढ गट त्यांच्यावर कारवाई करत नाही.
स्वीकृत संचालक न घेतल्याचा फटका
तीन संचालक अपात्र ठरल्यानंतर त्यांच्या ठिकाणी स्वीकृत संचालक घेण्याची संधी सत्तारूढ गटाला होती. मात्र दुर्लक्ष केल्याचा फटका बसला आहे.
अशासकीय मंडळाचा प्रयोग होऊ शकतो
विद्यमान संचालक मंडळामुळे नेत्यांची बदनामी झाल्याने सहकार कायद्याचा आधार घेऊन त्यांना घरी पाठवायचे आणि त्यांच्या ठिकाणी अशासकीय मंडळ आणता येते का? याचीही चाचपणी सुरु आहे. मात्र त्यापेक्षा प्रशासक आणून संघाच्या रोडावलेल्या बैलाला ताकद देता येते का? असा विचारही पुढे येत आहे.