मुंबई येथे रेल्वे पोलीस दलात असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील वैरागवाडीतील शंकर पाटील यांनी मुलगी शीतलच्या लग्नाच्या स्वागत समारंभात औक्षण करण्याचा मान पाच विधवांना देऊन महिला सन्मानाचा आदर्श पायंडा घातला. त्यांच्या या पुरोगामी विचारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शंकर यांची मुलगी शीतल हिचे लग्न वैभव शिंदे (रा. मुंबई) यांच्याशी झाले. दोघेही उच्चशिक्षित. त्यांचा स्वागत समारंभ गडहिंग्लज जवळील बुगटे आलूर (ता. हुक्केरी) येथील सभागृहात नुकताच झाला. स्वागत समारंभात त्यांनी वधू-वरांचा औक्षण करण्याचा पहिला मान पाच विधवांना दिला. त्यांच्या या निर्णयास मुलाकडील नातेवाइकांनी संमती दिली. ग्रामस्थ, मित्रमंडळींनीही याचे स्वागत केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेेक गावांत विधवा प्रथाबंदीचा ठराव करण्यात आला आहे. पतीच्या निधनानंतर सौभाग्याचे अलंकार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही चळवळ व्यापक होत असताना शंकर पाटील यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभात पाच विधवा महिलांना औक्षण करण्याचा सन्मान दिला. यातून या चळवळीला बळ मिळत असल्याचे समोर आले आहे.