कोल्हापूर : विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश क्षमता वाढविण्यासह त्यांच्यासाठी थम्ब इम्प्रेशन शिवाय शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील अभ्यासिकेत बसविण्याची सवलत मिळाली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याबाबतच्या मागणीचे निवेदन दिल्यानंतर सोमवारी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी याबाबतचा निर्णय घेतला.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अभ्यासिकेमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सोमवारी राबविण्यात येणार होती. संबंधित विद्यार्थ्यांसाठी ५० जागांची प्रवेश क्षमता होती. त्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांची ग्रंथालयाबाहेर रांग लागली होती. यावेळी, प्रक्रिया सुरू होताच तासाभरात निश्चित क्षमतेतील ३५ प्रवेश निश्चित झाले असून, आणखी १५ जणांचे प्रवेश होतील. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रांगेतील काही विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू झाला. त्यावर आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शांत करत ग्रंथपालांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेडरेशनच्या शिष्टमंडळाने ग्रंथपालांच्या कार्यालयात निवेदन दिले. शिष्टमंडळात फेडरेशनचे जिल्हा सचिव प्रशांत आंबी, योगेश कसबे, माधुरी पाटील, आदींचा समावेश होता. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास काँग्रेसच्या एनएसयुआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने संबंधित विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश क्षमता वाढविण्यासह त्यांच्यासाठी थम्ब इम्प्रेशन शिवाय ग्रंथालयातील अभ्यासिकेत बसविण्याची सवलत दिली जाईल, अशी ग्वाही डॉ. भोईटे यांनी दिल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अवधूत अपराध यांनी सांगितले. या शिष्टमंडळात एनएसयुआयचे भारत घोडके, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीधर पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अभ्यासिकेची नवी इमारत खुली करा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, या सर्वांना अभ्यासिकेत बसण्याची परवानगी मिळावी. सुमारे आठशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेल्या अभ्यासिकेची नवी इमारत खुली करावी. ग्रंथालयातील व्यवस्था यापूर्वी थम्ब इम्प्रेशनशिवाय व्यवस्थितपणे कार्यान्वित होती. त्यामुळे थम्ब इम्प्रेशनची व्यवस्था बंद करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.
अभ्यासिकेतील प्रवेश क्षमता वाढणार
By admin | Published: June 16, 2015 1:12 AM