कोल्हापूर : सीमा भागातील मराठी भाषिकांकरिता अपारंपरिक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे कौशल्य व उद्योजकता प्रमाणपत्र अभ्यासक्रम केंद्र शिनोळी येथील वसंत विद्यालय येथे सुरू झाला आहे. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाने केले आहे.
या केंद्राच्यावतीने सध्या पाच अभ्यासक्रम सुरू होत असून, यामध्ये काजू प्रक्रिया उद्योग व विक्री , बटाटा व रताळी प्रक्रिया उद्योग व विक्री, टॅली, ट्रॅव्हल्स ॲण्ड टुरिझम, ड्रेस डिझायनिंग यांचा समावेश आहे. हे अभ्यासक्रम स्थानिक भागाची गरज व उपयुक्तता विचारात घेऊन सुरू करण्यात येत असून, स्थानिकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रात्यक्षिकांवर आधारित हे कोर्सेस चालविले जाणार आहेत. वेळोवेळी गरजेनुसार नवीन कोर्सेसची भर घालण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसंत विद्यालय शिनोळी येथील कार्यालयात संपर्क करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.