कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा(आरटीई)अंतर्गत सन २०२१-२२ साठी २५ टक्के विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया आज, शुक्रवारपासून दि. ३० जून या कालावधीत होणार आहे.
आरटीईअंतर्गत दि. ७ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीची लॉटरी लागलेली आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड यादी आणि पुढील फेरीसाठी प्रतीक्षा यादी आरटीई पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात आली आहे. दि. ३० जूनपर्यंत पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. पालकांनी पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी गुरुवारी केले. दरम्यान, जिल्ह्यातील ३४५ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ३,१८१ जागा रिक्त आहेत. त्यासाठी २,६४५ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.