कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांनी मराठा दाखल्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती (टोकन) ग्राह्य धरून प्रवेश देण्यात यावा. त्याबाबतची सूचना सर्व महाविद्यालयांना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केली.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. राज्यात मराठा समाजासाठी नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण जाहीर झाले आहे. या समाजातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक प्रवेशासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये मराठा दाखला असल्याची पडताळणी केली जाते.
अशा विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल्याअभावी प्रलंबित ठेवले जातात. मराठा दाखला मिळविण्यासाठी अनेक कारणांस्तव विलंब लागत आहे. अनेक महा ई-सेवा केंद्रांमध्ये सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी ‘सेवा हमी कायद्या’चे कारण सांगितले जाते. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. वीज नसल्याने विलंब होऊ शकतो. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना मराठा दाखल्याची पोहोचपावती ग्राह्य धरून प्रवेश देण्यासंदर्भात तातडीने सूचना कराव्यात. दाखला मिळाल्यानंतर प्रवेश निश्चित करावा. जेणेकरून कोणताही विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवेशापासून वंचित राहू नये, याची दक्षता विद्यापीठाने घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
त्यावर डॉ. शिर्के यांनी दाखल्याची पोहोचपावती घेऊन प्रवेश देण्याबाबतची सूचना महाविद्यालयांना केली जाईल, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, तानाजी आंग्रे, राजू यादव, शशिकांत बिडकर, गीतांजली गायकवाड, सुनीता हनिमनाळे, सिद्धी मिठारी, राजेंद्र पाटील, मंजित माने, आदींचा समावेश होता.