लाभार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
उचगाव : लहान बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातच भेसळ असल्याचे उचगावात उघड झाले आहे. अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या मिरची पावडरमध्ये भेसळ झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची चिली पावडर देणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी लाभार्थ्यांच्या नातेवाइकांनी केली आहे.
ग्रामीण भागात एकीकडे स्मार्ट व डिजिटल अंगणवाड्या होत असताना अंगणवाडीतील प्रत्येक लाभार्थ्याला पोषण आहारासाठी पॅकबंद आहार शिजवून खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सकस आहार पाकिटे नियमित वाटप केली जातात. प्रत्येक लाभार्थ्याला एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंगणवाडी केंद्रातून नोंदणी झाल्यानंतर ही पॅकबंद पाकिटे वाटप केली जातात. या ठिकाणी लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या चिली पावडर (मिरची पावडर)मध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ झाली असून या निकृष्ट चिली पावडरला उग्र वास येत आहे. जेवणामध्ये पावडर टाकल्यानंतर फेस येत आहे. जेवणात ही पावडर वापरल्यानंतर अनेक लाभार्थ्यांचे आरोग्य बिघडले असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांच्याकडे केली.
दरम्यान, अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना ही पाकिटे उघडून बघण्याचे अधिकार नसल्याने वरून जे साहित्य येईल ते लाभार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी कोणत्याही अंगणवाडी सेविका- मदतनीस यांचा संबंध नसल्याचे प्रकल्पाकडून सांगण्यात आले. त्यामुळे करवीर तालुक्यात पुरवण्यात आलेली मिरची पावडर ही निकृष्ट असल्याने ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी करवीर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पोवार यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. या निकृष्ट पावडरचा वापर लाभार्थ्यांनी करू नये व ज्या लाभार्थ्यांपर्यंत ह्या पाकिटांचे वाटप झाले आहे, ती त्यांच्याकडून परत घेऊन पुन्हा प्रकल्पकडून चांगल्या प्रतीची मिरची पावडर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
फोटो : २८ उचगाव मिरची पावडर
ओळ:-
एकात्मिक बाल विकास योजनेतील मिरची पावडरीमध्ये भेसळ झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.