दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबातील दादू सलगर हे शिक्षणानंतर पुणे येथे आले. व्यवसायाचे स्वप्न साकारण्यात उद्भवलेल्या विविध अडचणींवर मात करीत त्यांनी व्यवसायात यशाला गवसणी घातली आहे. त्यांनी सुरुवातीला शेती आणि शेळीपालन केले. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केले. पुढे त्यांनी रसवंती आणि मोसंबी ज्युस विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये जम बसल्यानंतर त्यांनी उकडलेले मक्याचे कणीस आणि ‘सलगर अमृततुल्य चहा’ विक्री सुरू केली. त्याच्या माध्यमातून त्यांनी यशाचे शिखर गाठले. ‘सलगर अमृततुल्य चहा’च्या सध्या महाराष्ट्रात आणि बाहेर सुमारे १९० शाखा आहेत. या चहाच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून त्यांनी अल्प गुंतवणुकीमध्ये युवा पिढीतील नवउद्योजकांना व्यवसाय, रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रतिक्रिया
मी अनेकांना व्यवसाय, नोकरीची संधी उपलब्ध करून देत असल्याचे मला समाधान आहे. गुणवत्ताच व्यवसायासह आपल्याला पुढे नेते. त्यामुळे नवउद्योजकांनी व्यवसायात उत्पादनाची गुणवत्ता कायम राखावी. गुणवत्तेबाबत तडजोड करू नये. कामगारांच्या सोबतीने स्वत:ही काम करणे आवश्यक आहे.
- दादू सलगर