आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : मार्च एडिंग जवळ आल्याने सहकारीसह राष्ट्रीयकृत बॅँकांची एकच धांदल उडाली आहे. रविवारी सुट्टी दिवशीही बॅँकांचे कामकाज सुरू राहिले पण ग्राहकांचा तसा प्रतिसाद दिसला नाही.
मार्च महिना बॅँकांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. वर्षभर वाटप केलेल्या कर्जाची वसुली मोहीम राबवावी लागते. वसुली पथक एका बाजूला काम करत असताना बॅँकेचे इतर कर्मचारी अंतर्गत कामात व्यस्त राहतात. आगामी पाच दिवसात बॅँकांची धांदल वाढणार आहे. ठेव व कर्ज खात्यांवर व्याज चढविणे, थकीत कर्जे व त्यावरील व्याजाची ताळेबंदाला तरतुद करणे, गुंतवणूक व त्यातून मिळणारे उत्पन्न घेऊन नफा तोटा पत्रक तयार करण्याचे काम बॅँकेत सध्या सुरू आहे.
महिन्याअखेर ग्राहकांना करभरणा करणे तसेच अन्य सरकारी देणी देणे सुलभ व्हावे, यासाठी रिझर्व्ह बॅँकेने २५ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत बॅँका सुरू ठेवण्याचे आदेश संलग्न बॅँकांना दिले आहे. त्यानुसार रविवारी दिवसभर सहकारी बॅँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बॅँकांच्या शाखा सुरू राहिल्या, पण ग्राहकांचा प्रतिसाद दिसला नाही.