आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर दि. २५: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अंबाबाईला साकडे घालण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी मंगळवारी अंबाबाईचा प्रसाद देत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना एकसंध राहण्याचा सल्ला दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत अंबाबाईला साकडे घालण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मंगळवारी सकाळी अंबाबाई मंदिरात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रकाश गजबिया, संध्यादेवी कुपेकर, विद्याताई चव्हाण, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह नेते उपस्थित होते.
अजितदादा पवार मंदिरातून बाहेर आल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ यांनी अजितदादांना ‘सरकारला सुबुद्धी दे’ असे साकडे अंबाबाईला घातले का, अशी विचारणा केली, त्यावर अजितदादा मुश्रीफ आणि सुनील तटकरे यांच्या हातात देवीचा प्रसाद देत म्हणाले, ‘ते तर मी म्हणालोच, पण जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र राहावे,’ असेही साकडे घातलेय. यावर दोन्ही नेत्यांनी हसून साकडे घातलेला प्रसाद घेतला.
दर्शनासाठीही ‘संघर्ष’
नेते अंबाबाई मंदिरात आले तेव्हा देवीची आरती आणि शंखतीर्थ हे धार्मिक विधी सुरू असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत राधाकृष्ण विखे-पाटील पितळी उंबऱ्याच्या आत गेले. मात्र, अजितदादांना बाहेरूनच देवीला नमस्कार करून जय-विजय मूर्तीच्या शेजारील कट्ट्यावरून उडी टाकून मंदिराबाहेर ‘संघर्ष’ करत यावे लागले.
प्रसाद खा पण एकत्र राहा...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित संघर्ष यात्रेत मंगळवारी अजितदादा पवार यांनी अंबाबाईला साकडे घातले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व आमदार हसन मुश्रीफ यांना प्रसाद देत त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना एकसंध राहण्याचा सल्ला दिला.