कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या शाहू मार्केट यार्डातील अडत दुकानात अल्प प्रमाणात व्यवहार होता. मात्र, तिथे आम्ही गूळ लावल्यानंतर व्यवहार वाढत गेला. दरवर्षी कोट्यवधीचा गूळ संघाकडे लावतो, त्यापोटी आपणास ॲडव्हास दिले जाते. सदरची आवकजावक सुरू असल्याने पैसे थकीत राहण्याचा प्रश्नच येत नसल्याची माहिती शेतकरी संघाचे ज्येष्ठ संचालक विजयकुमार चौगले यांनी पत्रकातून दिली.
गेली अनेक वर्षे आपण गुळाचे उत्पादन घेतो. हा गूळ इतर ठिकाणी लावत होतो, मात्र संघाने आग्रह केल्यानंतर तो संघाच्या अडत दुकानात गूळ लावला. त्यामुळे अडत दुकानाचा व्यवहार वाढला. वर्षाला साधारणत: एक कोटीचा गूळ लावत होतो, त्यापोटी आपणास ॲडव्हान्स दिला. दरवर्षी गूळ लावणे त्यातून ॲडव्हान्स कपात करून घेणे परत दुसऱ्या वर्षी गुळावर ॲडव्हान्स उचल करणे असाच व्यवहार गूळ व्यवसायात आहे. या पैशाची परतफेड ज्या त्यावेळी केली असल्याने आपली कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे विजयकुमार चौगले यांनी पत्रकात म्हटले आहे.