भाषा हे जीवन व्यवहाराचे साधन आहे. परंतु, अभिवाचनात ते भावनांचे वहन करणारे माध्यम बनते. शब्दांना जिवंत करण्याचे कार्य अभिवाचनातून साधले जाते, असे प्रतिपादन भालजी पेंढारकर फिल्म अॅण्ड थिएटर अॅकॅडमीचे विभागप्रमुख डॉ. हिमांशू स्मार्त यांनी केले.
आजरा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत 'अभिवाचन : कला आणि कौशल्य' या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. स्मार्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अभिवाचनाची सैद्धांतिक मांडणी करताना डॉ. स्मार्त म्हणाले, भाषेतील पोत, लय, नाद, विराम आणि आशय या गोष्टी अभिवाचन करताना महत्त्वाच्या ठरतात. अभिवाचन करताना अभिवाचकाला भाषेतील या घटकांचे स्थान आणि त्यांचे उपयोजन कळले पाहिजे. या घटकांची समज अभिवाचनाला उंची प्राप्त करून देते.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये अभिवाचनाचे सादरीकरण अभिनेत्री नेहा नानिवडेकर, अभिनेत्री मनाली पाटील व डॉ. हिमांशू स्मार्त यांनी केले.
प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ स्वागत केले. अतिथी परिचय समन्वयक डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी करून दिला. डॉ. आप्पासो बुडके यांनी सूत्रसंचालन केले.
सहसमन्वयक डॉ. टी. आर. कावळे यांनी आभार मानले. प्रा. नीलेश कुलकर्णी यांनी तंत्रसाह्य केले.
कार्यशाळेस प्रा. शिवानंद सिदगोंड, डॉ. नीलेश शेळके, डॉ. आनंदा वारके, डॉ. चंद्रकांत पोतदार, डॉ. सुकुमार आवळे व आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.