सांगली : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी वकील संघटनेतर्फे आज, शनिवार सकाळी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. राजवाडा चौकात न्यायाधीशांची गाडी अडवून वकिलांनी त्यांना पुष्पगुच्छ दिले. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी खंडपीठासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देऊन आज एक वर्ष पूर्ण झाले; मात्र आश्वासनांची अंमलबजावणी न केल्याने याचा वकिलांनी निषेध करुन ‘जेन्टलमेन-डे’ म्हणून साजरा केला.जिल्ह्यातील वकिलांनी मुख्य न्यायाधीशांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने याचा निषेध करून ‘जेन्टलमेन-डे’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी साडेदहाला सर्व वकील राजवाडा चौकात जमा झाले होते. त्यांनी येणाऱ्या सर्व न्यायाधीशांना अडवून घोषणाबाजी केली. गांधीगिरी पद्धतीने केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. न्यायाधीशांना पुष्पगुच्छ दिले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात वकिलांनी आपली एकजूट दाखवून द्यावी. या आंदोलनात प्रताप हरुगडे, एस. एम. पखाली, सचिन पाटील, एच. के. पाटील, अरविंद देशमुख, सुरेश भोसले, झुलेखा मुतवल्ली, सविता शेडबाळे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
खंडपीठासाठी वकिलांचे गांधीगिरी आंदोलन
By admin | Published: February 01, 2015 12:50 AM