- निंगाप्पा बोकडे
चंदगड : आपण आजपर्यंत बैल, गाय, म्हैस, घोडा यांची किंमत लाखात ऐकली असेल, पण एका शेळीची किंमत एक लाख एक्कावन्न हजार रुपये हे ऐकून नवलच वाटेल. होय, पण हे खरं आहे. ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट आहे एका जिद्दी सुशिक्षित दाटे (ता. चंदगड) येथील तरुणाची आहे.
चार वर्षांपूर्वी दाटे येथील ज्ञानेश्वर गावडे या तरुणाने कर्ज काढून पत्नी ज्ञानेश्वरी हिच्या सहकार्याने सुरू केलेला आफ्रिकन शेळीपालनाचा व्यवसाय आज लाखोची उलाढाल करतो आहे. सुरुवातीला सगळ्यांनीच नावे ठेवली होती. पण खचून न जाता संयम, जिद्द व कष्ट करण्याची तयारी असली की यश हमखास मिळते हे त्याने आजच्या झटपट पैसे मिळवण्याच्या नादात स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या तरुणांना एक आदर्श घालून दिला आहे.
ज्ञानेश्वर या जिद्दी तरुणाने वातावरणातील बदलाचे आव्हान स्वीकारून आफ्रिकन वंशावळीची एक शेळी व एक बोकड पाळण्यासाठी आणले. त्यांची वंशावळ वाढवून त्यातील एक गाभण शेळी ''लाख ''मोलात विकल्याने पंचक्रोशीतीत शेतकरी व ग्रामस्थ यांच्या भुवया उंचावल्या आहेत.आज ज्ञानेश्वरच्या गोट फार्मवर दहा शेळ्या आहेत.
महत्त्वाच्या घटकांचा अभ्यासबेभरवशाच्या वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलाने नेहमी तोट्यात येणाऱ्या शेतीव्यवसायाला पूरक म्हणून या सुशिक्षित तरुणाने शेळीपालन करताना पशूचे आजार, आहार, मार्केटिंग, संगोपन या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करून जिद्द, चिकाटी व पुरेपूर वेळ देऊन दाटे येथे ज्ञानेश्वरी गोट फार्म नावाचा शेळीपालन व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू केला. मोरगाव येथील विलास समगीर व महेश समगीर यांनी या शेळ्या खरेदी केल्या. या व्यवसायासाठी गावडे यांना म्हलारी ढेंबरे, तेजस भोईटे, रणजित मस्कर, सतीश शिंदे, प्रफुल्ल भोईटे यांचे मार्गदर्शन मिळाले.