कोल्हापूर : वर्कऑर्डर देवून काम सुरू न केलेल्या ठेकेदारांना नोटीस काढा अशा सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्यानंतर महापालिकेने नेमक्या किती कामांना वर्क ऑर्डर दिली, याचा शोध लोकमतने पंधरा दिवसापूर्वी घेतला. त्यावेळी या कामांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे ‘वर्क ऑर्डर दिलेल्या कामांचा पत्ता लागेना’ अशा मथळ्याखाली ६ डिसेंबरला बातमी प्रसिध्द केली. त्याची दखल घेवून महापालिकेने तब्बल १५ दिवसानंतर २३७ कामांची वर्क ऑर्डर दिली आहे. त्यापैकी ८४ च कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.
महापालिकेची मंजूर विविध विकास कामे पूर्ण होण्यात प्रचंड दिरंगाई होत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारी आहेत. म्हणूनच प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेवून त्यामध्ये वर्क ऑर्डर देवूनही कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कारवाई करा, असा आदेश दिला. हा आदेश दिल्यानंतरही कामे सुरू न केलेेले कोण ठेकेदार आहेत, किती जणांना वर्क ऑर्डर दिली, किती कामे पूर्ण झाली याचा पत्ता प्रशासनास लागत नव्हता. या प्रशासकीय गोंधळाचे सविस्तर वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने वर्कऑर्डर दिलेल्या कामांचा शोध घेण्यास सुरूवात केले. शोध लागल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर त्यांनी प्रसिध्दीला माहिती दिली. त्यात ते म्हणतात, मार्च २०२३ अखेर शासनाच्या विविध विकास योजनेतून मंजूर झालेल्या २३७ कामांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. यातील १०४ कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी गॅस अथवा पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईनची कामे प्रस्तावित असल्याने ही कामे पूर्ण झाल्यानंतर गटरची कामे पूर्ण करण्यात येणार आहे.