रमेश वारके ।लोकमत न्यूज नेटवर्कबोरवडे : निवडणूक म्हटले की, त्यांच्या मनाची घालमेल व्हायची. मनात जिद्द आणि अंगात निवडणुकीची रग नेहमीच धुमसायची. एकट्यानेच प्रचार करायचा. निवडणूक म्हटले की, भार्इंनी उमेदवारी अर्ज भरला का? याची लोकांच्यात चर्चा रंगायची! निवडणूक कोणतीही असू देत, मग ती ग्रामपंचायतीची किंवा लोकसभेची, भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. २०१९ची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३३ वी निवडणूक, परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नसून, भाई उमेदवार नाहीत अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे.वयाच्या ३० व्या वर्षी १९९० साली भाईंनी प्रथमच बोरवडे गावची ग्रामपंचायत निवडणूक लढवली, परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर १९९२ साली शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांनी कागल पंचायत समितीच्या बोरवडे मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळी कोणताही राजकीय पाठिंबा नसतानाही त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराशी चांगली लढत दिली, परंतु यामध्ये त्यांचा केवळ सहा मतांनी पराभव झाला.निवडणुकीत पराभव झालेला असला तरी भाईंचा स्वभावच लढण्याचा असल्याने त्यांनी त्या पुढील काळात सलग आठ वेळा पंचायत समिती, आठ वेळा जिल्हा परिषद, आठ वेळा विधानसभा, तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा बिद्री साखर कारखान्याची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. यामध्ये त्यांना एकदाही यश मिळाले नसले तरी त्यांनी नाउमेद न होता गेली ४० वर्षे प्रत्येक निवडणुकीत आपली उमेदवारी सातत्याने कायम ठेवली आहे. भार्इंनी एकदा उमेदवारी अर्ज भरला की ते एकटेचप्रचाराला बाहेर पडायचे. कधी पायी चालत, तर कधी एसटीने प्रवास करत ते आपला प्रचार स्वत:च करायचे.४० वर्षांच्या काळात ग्रामपंचायत ते लोकसभा अशा ३२ निवडणुका लढविल्या आहेत. सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारीही मी केली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी ही निवडणूक लढवू शकत नाही, परंतु सहा महिन्यांनंतर होणारी विधानसभा आणि त्यापुढील काळात सर्वच निवडणुका लढविण्याची माझी इच्छा आहे. - भाई पी. टी. चौगले
Lok Sabha Election 2019 ४० वर्षांनंतर प्रथमच भाई पी. टी. चौगले मैदानाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:01 AM