कोल्हापूर : पहिला हप्ता १७०० रुपयेच देणार, असे म्हणणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी नरमाईची भूमिका घेत शासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निश्चित केलेला ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य केला. शासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्यामुळे कारखानदारांना अखेर झुकावे लागले. त्यामुळे गळीत हंगाम सुरळीत होण्याचा मार्ग खुला झाला. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. मुश्रीफ म्हणाले,‘ एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्यामुळे महिन्यापूर्वी कारखानदारांची बैठक घेऊन पहिला हप्ता १७०० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासन, साखर संघ, शेतकरी संघटना, कारखानदारांशी चर्चा करून ८०-२० टक्क्यांप्रमाणे एफआरपी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार गुरुवारी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत ८०-२० चा फॉर्म्युला मान्य केला आहे.’ यंदा एकरकमी एफआरपीवरच हंगाम सुरू झाला; पण साखरेचा दर व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी ‘८०-२०’ टक्क्यांचा फॉर्म्युला मांडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन पावले माघार घेत त्यावर ११ डिसेंबरला शिक्कामोर्तब केले. मात्र, यापूर्वी सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन बैठक घेत ‘एफआरपी’च्या ७० टक्क्यांप्रमाणे सरासरी १७०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. ‘८०-२०’ चा फॉर्म्युला ठरला तरी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी १७०० रुपयेच पहिला हप्ता उत्पादकांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली. दोन दिवसांपासून संघटना आंदोलन करत असल्यामुळे अनेक ठिकाणी ऊस तोड बंद झाली होती. कारखाने बंद पाडण्याचे नियोजन ‘स्वाभिमानी’ने केले आहे. आंदोलनाची व्यापकता वाढते आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत कारखानदारांची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला सायंकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. उपस्थित सर्वच कारखानदारांनी आपली आपली भूमिका मांडली. कारखानदारीसमोरील समस्या सांगितल्या. अन्य जिल्'ांतील साखर कारखानदारांशी बैठकीतच संपर्क साधून ‘८०-२० फॉर्म्युला’ मान्य आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी आम्ही १५०० रुपयांवर पहिला हप्ता देणार नाही, असे इतर जिल्'ांतील कारखानदारांनी सांगितले. या विषयावरही चर्चा रंगली. कोल्हापूर जिल्'ातही पहिला हप्ता १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असा कारखानदारांनी सूर काढला. आंदोलन तीव्र झाले तर कारखाने आठ दिवस बंद ठेवू मात्र १७०० रुपयांवर देणे शक्य नाही, असे बहुतांशी साखर कारखानदारांचे म्हणणे होते. कारखाने बंद ठेवल्यानंतर शेतकऱ्यांतून उठाव होईल नंतर आपोआप हंगाम सुरळीत होईल, असे मत काही कारखानदारांनी मांडले. बैठकीस शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बिद्रीचे के. पी. पाटील, मंडलिक कारखान्याचे संजय मंडलिक, शरद साखर कारखान्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त शिरोळचे गणपतराव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ‘वारणा समुहाचे नेते व जनसुराज्य’चे विनय कोरे, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.
अखेर कारखानदार झुकले..!
By admin | Published: December 18, 2015 1:00 AM