गडहिंग्लज - आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना स्वबळावर चालविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी(२०) बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम असून आठवडाभरात कारखाना सुरू होईल,अशी माहिती अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी दिली.
हरळी येथे कारखान्याच्या कार्यस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 'ब्रिस्क कंपनी'ने कारखाना सोडल्यानंतर झालेल्या विलंबाची कारणमीमांसा आणि तयारीची माहिती दिली. आमच्या दोघांमुळेच ( शिंदे व नलवडे ) कारखाना सुरू होत आहे, असेही ते म्हणाले.
शिंदे म्हणाले, कारखाना कोणत्याही वित्तीय संस्थेचे अगर शासनाचे कोणत्याही प्रकारचे देणे लागत नाही. तरीदेखील 'कांहीच्या विरोधा'मुळे राज्य शासनाची थकहमी व राज्य सहकारी बँकेपासून जिल्हा बँकेपर्यंत आणि खाजगी कंपन्यांचेही कर्ज मिळाले नाही, त्यामुळे हंगामाला उशीर झाला.
परंतु, काही संस्था आणि व्यक्तींकडून मिळालेल्या अर्थसहाय्यातून कारखाना सुरू करीत आहोत. केवळ डिस्टिलरीच्या उत्पादनातून कामगारांचा पगार भागेल. तोडणी-ओढणी यंत्रणेसह साखर उत्पादनापर्यंतची सर्व तयारी केली आहे. अवकाळी पावसामुळे यावर्षीचा हंगाम एप्रिलपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
गडहिंग्लज कारखान्यावर विश्वास असणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरेसा ऊस अजूनही कार्यक्षेत्रात शिल्लक आहे. त्यामुळे किमान सव्वातीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. ऊसाची बीले वेळेवर आणि एफआरपीपेक्षा नक्कीच जादा दर देऊ,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आम्ही, १२ संचालक एकत्र..!जातीवंत शेतकरी संचालक अमर चव्हाण,बाळकृष्ण परीट यांच्या तळमळीमुळेच कारखाना लवकर सुरू होत आहे. आम्ही निरनिराळ्या पक्षांचे असलो तरी कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू झाला पाहिजे,असे म्हणणारे आम्ही १२ संचालक एकत्र आहोत. कारखाना बंद पडावा म्हणून प्रयत्न करणारे कोण आहेत? ते लोकांना माहिती आहे, त्याबद्दल आज काही बोलणार नाही, असेही शिंदेंनी सांगितले.
त्यांचाही पक्ष,गट एकच !कारखाना चालू करण्यासाठी धडपडणाऱ्यांचा पक्ष, गट, धर्म एक आहे. तसा कारखाना बंद पाडणाऱ्यांचा पक्ष-गटही एकच आहे,असा टोला उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी विरोधकांना लगावला.