उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युतीतील गर्दी ओसरेल :सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 12:48 PM2019-09-13T12:48:13+5:302019-09-13T12:50:16+5:30
‘गेल्या दोन दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात भेटायला येत असून, अनेकांशी चर्चा झाली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा,’ असा टोला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अनेकजण कॉँग्रेसच्या संपर्कात असून थोड्या दिवसांत नवीन अध्याय सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
कोल्हापूर : ‘गेल्या दोन दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात भेटायला येत असून, अनेकांशी चर्चा झाली आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत; मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघा,’ असा टोला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला. अनेकजण कॉँग्रेसच्या संपर्कात असून थोड्या दिवसांत नवीन अध्याय सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
आमदार पाटील म्हणाले, ‘एनएसयूआय’पासून मी कॉँग्रेसमध्ये काम करीत आहे. अडचणीच्या काळात जबाबदारी दिली आहे. विधानसभा तोंडावरच असल्याने फारशी डागडुजी करता आलेली नाही; पण विधानसभेनंतर सभासद नोंदणीच्या माध्यमातून काम करणार आहे.
सोशल मीडियात आम्ही कमी पडतो, हे खरे आहे; म्हणूनच जिल्हा कॉँग्रेसचा स्वतंत्र मोबाईल क्रमांक सुरू केला असून, त्या माध्यमातून कॉँग्रेसचे नवीन कार्यक्रम आणि सरकारची चुकीची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. वीज दरवाढीने उद्योजक हैराण असून शासनाने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
मुख्यमंत्र्यांशी चर्चेला बोलावतात आणि निवेदन घेऊनच माघारी पाठविले जाते. चर्चा व्हायला पाहिजे आणि अडचणी सोडविण्याची जबाबदारी शासनाची आहे, असे ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.
महाडिक यांच्या आव्हानाचा विषय संपला
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेची जोरदार तयारी केली असून त्यात धनंजय महाडिक यांच्या प्रवेशामुळे ताकद वाढली आहे. हे आव्हान कसे पेलणार? असे विचारले असता, अगोदरपासूनच महाडिक भाजपसोबत आहेत आणि आव्हानाचे विचाराल तर महाडिकांच्या आव्हानाचा विषय कधीच संपल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
‘स्वाभिमानी’शी चर्चा बाकी
दोन्ही कॉँग्रेसमधील जागावाटप पूर्ण झाले असून आता फक्त राजू शेट्टी यांच्याशी चर्चा बाकी आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आघाडी भक्कम होईल, असे पाटील यांनी सांगितले.