कोल्हापूर: कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. किलोचे भाव १०० रुपयांवर पोहोचल्याने किचन बजेटही कोलमडले आहे. परवडत नसल्याने ताटातून भाज्याच गायब झाल्या आहेत. बाजारात आवकही कमी झाली आहे. पावसामुळे प्रत खालावली तरी व्यापाऱ्यांकडून मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.नवरात्रौत्सव काळात शाकाहारवरच भर असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढते; पण बाजारात भाजीपालाच नाही. मार्केट यार्डात सौद्याला येणारा कृषिमालही कमी झाला आहे. याला गेले आठवडाभर सुरू असलेल्या परतीचा पाऊस कारणीभूत ठरला आहे. कोल्हापुरात आजूबाजूच्या तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटक, सांगली, सोलापूर येथून कृषी माल सौद्यासाठी येतो; पण आठवडाभर सर्वदूर पाऊस कोसळत आहे.
ढगफुटीसारख्या पडलेल्या या पावसामुळे भाजीपाल्याची पिके पाण्याखाली गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतमाल झाडावरच कुजला आहे, तर कुठे त्याची तोडणी करण्यासाठी शिवारात जाता येत नसल्याने तो बाजारापर्यंत येऊ शकलेला नाही. परिणामी बाजारात सध्या भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. जो काही भाजीपाला बाजारात आला आहे, तोही निकृष्ट आहे. त्याची प्रत खूपच खालावलेली आहे.वांगी, दोडका, बिन्स, कोबी, कारले, फ्लॉवर, गवार, इतक्याच भाज्या बाजारात दिसत आहेत. त्याची गुणवत्ताही कमालीची खालावलेली आहे. तरी त्याचा दर १०० ते १२० रुपये किलो असा आहे. मागील आठवड्यात ३५ ते ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची आता ८० रुपये किलोवर गेली आहे.पालेभाज्या ३० रुपये पेंढी मेथीकांदेपात, पोकळा, शेपू या दहा ते पंधरा रुपये पेंढी मिळत होत्या. त्याची किंमत आज ३० रुपये झाली आहे. घाउक बाजारात हाच दर शेकड्याला ८०० ते हजार रुपये आहे; पण किरकोळ बाजारात मात्र तिप्पट दराने विकल्या जात आहेत.टोमॅटोची आवक दिसत आहे; पण त्याची प्रत खालावलेलीच आहे. दरही किलोला ४० ते ५० रुपये असेच आहेत. कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा असली तरी किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये पेंढी अशा चढ्या दराने विक्री होत आहे.कडधान्येही आवाक्याबाहेरभाजीपाला महागला आहे, म्हणून कडधान्ये खायची म्हटली तरी तीही आधीच कडाडली आहेत. गेल्या पंधरवड्यापासून कडधान्याचे दरही वाढले आहेत. तूर १२५, मूग ९४, वाटाणा ११०, चवळी ७०, हरभरा ७५, मसुरा ८० असे सर्वसाधारण दर आहे. मागच्या महिन्यात हेच दर ६० ते ७० च्या आसपास होते.कांदे दरात आणखी उसळीकांद्याच्या दरात आणखी वाढ झाली असून, घाऊक बाजारात कमाल दर ६०, तर किमान ४० रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारातही हीच परिस्थिती असून, निकृष्ट पद्धतीचा भिजका कांदा ५० ते ६० रुपयांना विकला जात आहे.