कसबा बावडा :
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील हे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधून कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर सोमवारी घरी परतले. कोरोनावर मात केल्यानंतर अत्यंत भावुक झालेल्या बजरंग तात्यांनी डी. वाय.पाटील हॉस्पिटलचे व पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचे विशेष आभार मानले.
काॅंग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते असलेले बजरंग पाटील हे विविध संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. सुमारे दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाल्याने डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बजरंग पाटील यांना दाखल करण्यात आले होते. कोरोना विभागप्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय टीम व कर्मचाऱ्यांनी पाटील यांच्यावर कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार सुरू केले. त्यानुसार पाटील यांची प्रकृती सुधारू लागली व अखेर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
कोरोनामुक्त झालेल्या बजरंग पाटील यांना सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अत्यंत भावुक झालेल्या पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे आभार मानले. ‘येथील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी अगदी घरच्याप्रमाणे आपली काळजी घेतली. हॉस्पिटलमध्ये दाखल होतानाच येथील उपचारांनी पूर्णपणे बरा होणार याची खात्री होती. येथील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलवरील विश्वास अधिकच वाढला आहे.
योग्य औषधोपचाराबरोबरच समुपदेशनाच्या माध्यमातून मिळालेल्या मानसिक आधारामुळे कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरलो' असे बजरंग पाटील यांनी यावेळी सांगितले.
फोटो : ०१ बजरंग पाटील
कोरोनावर मात केल्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे आभार मानताना जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील. समवेत वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील आदी.