धामोड : एकच अर्ज शिल्लक राहिल्याने धामोड (ता .राधानगरी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत पोतदार यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस. बी. मिसाळ यांनी घोषित केले.
धामोड (ता .राधानगरी ) येथील ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड आज पार पडली. विद्यमान उपसरपंच सुभाष गुरव यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. पण सत्ताधारी गटात अंतर्गत वादावादीतून इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी सत्ताधारी गटातील प्रशांत पोतदार व सीताराम फडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले व त्यानंतर नाट्यमय घडामोडीना सुरुवात झाली.तेरा सदस्यसंख्या संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी नवने गटाकडे दहा सदस्य व लोकनियुक्त सरपंच असे संख्याबळ होते. तर विरोधी गटाकडे तीन सदस्य होतो . पण आज सत्ताधारी गटातीलच दोघांनी उपसरपंच पदासाठी फॉर्म भरले.
सत्ताधारीतील एका गटाने विरोधी तीन सदस्यांना विश्वासात घेत विरोधातील तीन व दहा मधील चार सदस्य एका बाजूला तर सत्ताधारील दुसर्या गटाने सहा सदस्य व लोकनियुक्त सरपंच असे सात सदस्यसंख्या बळ निर्माण केले. सरपंच यांच्या विशेष अधिकाराच्या वापराची ताकद दाखवून संख्याबळ आठवर नेण्याचा कट आखला.एका गटाने अर्ज मागे घेत उपसरपंच निवडीतून माघार घेतली व सभागृहाकडे पाठ फिरवली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस. बी. मिसाळ यांनी प्रशांत पोतदार यांचा एकच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची धामोड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले.
आज प्रत्यक्ष निवडणुकी दिवशी जरी नाट्यमय घडामोडी घडल्या असल्या तरी लोकमतने धामोडच्या उपसरपंचपदी प्रशांत पोतदार यांचीच निवड होईल होईल असे वृत्त आज छापल्याने 'लोकमत' चा अंदाज तंतोतंत खरा ठरल्याची चर्चा सभागृहात रंगली होती .