इचलकरंजी : कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसेस चालत नसतील तर महाराष्ट्रातही कर्नाटकच्या बस येऊ देणार नाही. असे म्हणत शिवसेनेच्यावतीने येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मोर्चा काढला. कर्नाटक शासन आणि कन्नड वेदिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्नाटक बसमधील प्रवाशांना खाली उतरवून बसेस रिकाम्याच रवाना केल्या. आंदोलनामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिवेसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांना धक्काबुक्कीसह कर्नाटक राज्यात महाराष्ट्रातील बसेसवर दगडफेकीचा प्रकार घडला. याचे पडसाद इचलकरंजीत उमटले. घटनेचा निषेध नोंदवत शहर शिवसेनेने रस्त्यातच कर्नाटकच्या बसेस अडवल्या. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घोषणाबाजी करत आंदोलकांनी मुख्य बसस्थानकावर मोर्चा काढला.
बसस्थानक प्रमुखांची भेट घेऊन महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेस चालणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर आंदोलकांनी कर्नाटक शासन आणि कन्नड वेदिका संघटनेच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, वाहतुक सेना उपजिल्हा प्रमुख शिवानंद हिरेमठ, सागर कुराडे, सुरज जाधव, मेहबुब पठाण, बाळु आडाव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.