कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. निव्वळ घोषणा केल्या जात आहेत. आम्ही कोणतेही निर्णय घेतले, तरी मराठा समाज काहीच करू शकत नाही, असा सरकारचा समज झाला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी कोल्हापुरातून पडणार असल्याचे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज माझे पणजोबा आहेत. त्यामुळे एक मराठा म्हणून सरकारला प्रश्न विचारतो की, आम्ही भीक की, खैरात मागतोय का? आरक्षण आमचा अधिकार, हक्क आहे. जे आरक्षण आम्हाला मिळाले होते. ते या सरकारने घालविले आहे. पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार काहीच पाऊल उचलत नाही. त्यामुळे आता मराठा काय आहे. आपली ताकद काय आहे ते सरकारला दाखविण्यासाठी मराठा समाज एकत्र यावे. पुन्हा लढा उभा करावा. आरक्षणासाठीच्या लढ्याची ठिणगी लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापुरातून पडेल. या लढ्याकरिता समाजाला संघटित करण्यासाठी एक मराठा म्हणून मी आवश्यक ती सर्व पाऊल उचलणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मराठा समाजातील बांधव, युवकांना भेटणार आहे. विविध संघटनांशी समन्वय साधून त्यांना एकत्रित करणार आहे. आरक्षण देण्याबाबत पुढील पाऊलं उचलण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
चौकट
मराठा समाजाने नेतृत्व करायचे
आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व हे मराठा समाजाने करायचे आहे. गेल्यावेळी ५८ मोर्चे काढले म्हणून आपल्याला आरक्षण मिळाले. त्यावेळी सामान्य मराठा म्हणून क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालो. मी पहिल्यांदा मराठा असून आणि नंतर पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र यावे. पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून एक मराठा म्हणून मी या लढ्यात सामील होणार आहे. ही भूमिका मी मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकीत स्पष्ट केली असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
समरजितसिंह घाटगे म्हणाले
मराठा समाजाला गृहित धरून आरक्षणाबाबत राज्य सरकार हलगर्जीपणाने निर्णय घेत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही नाही, तर सत्ताधारी राजकारण करत आहेत.
पुढच्या पिढीसाठी आता आपण सर्वांनी पक्ष, गट-तट सोडून एकत्र यावे.
आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वास्थ बसायचे नाही.
राज्याला दिशा देणारे आंदोलन हे कोल्हापूरने उभारले पाहिजे.