कोल्हापूर, दि. 13 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या दस-याच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत द्विधावस्थेत आहेत. मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन संघटना काढून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नवीन संघटनेचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. याविषयी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यभरातील शेतकऱ्यांची मते जाणून संघटनेचे नाव ठरविले जाणार आहे. नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावे सुचवली आहेत. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. स्वाभिनामी शेतकरी संघटनेत काम करत असताना मला काही कारण नसताना चक्रव्यूहात गोवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आत्तापर्यंत आम्ही अनेक वार झेलले आहेत. आम्ही संघटनेच नेतृत्व उभे केले. मात्र, नेतृत्वावर कधीही शिंतोडे उडू दिले नाहीत. यापुढे आम्हाला कोणी अपमानित करु शकणार नाही. तसेच, माझ्या कार्यकर्त्याला सन्मान मिळेल, असेही यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले.
सदाभाऊ खोतांची हकालपट्टी...कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी संघटनेविरोधात भूमिका मांडत असल्याने त्यांना संघटनेत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सदाभाऊ खोत यांची चौकशी केल्यानंतर त्यांची संघटनेतून हकालपट्टी केली.
आरोपांमुळे संघटनेची बदनामी...आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांची समितीने हकालपट्टीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर होणा-या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे, स्वाभिमानी सदस्य समितीचे दशरथ सावंत यांनी सांगितले.
सदाभाऊंच्या हकालपट्टीचा निर्णय योग्य... सदाभाऊ खोत यांच्या संबंधी निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीला पूर्ण अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत समितीने घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे शेतकरी संघटनेवर किंवा चळवळीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.