लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतल्याने कर्मचारी संघटनेने दोन दिवस कामबंद आंदोलन केले. तत्पूर्वी शनिवार व रविवार असल्याने सलग चार दिवस सरकारी बँकांचे कामकाज ठप्प झाले हाेते. त्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून बॅंकांच्या दारात ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.
आयडीबीआय बँकेसह इतर दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. सरकारच्या या निर्णयाला कर्मचारी संघटनांनी ताकदीने विरोध केला आहे. याच अनुषंगाने सोमवारी व मंगळवारी कामबंद आंदोलन करून सरकारच्या निर्णयाचा निषेध कर्मचाऱ्यांनी केला. बँका बंद राहिल्याने १,६०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. शनिवार, रविवार बँकांना सुट्टी होती, त्यानंतर दोन दिवस संप झाल्याने ग्राहकांची कुचंबणा झाली. त्याचा परिणाम सहकारी बँकांच्या व्यवहारावरही झाला.
बुधवारी बँकांचे कामकाज सुरळीत सुरु झाले. सकाळी दहा वाजल्यापासूनच सरकारी बँकांच्या दारात ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत बँकांच्या शाखांमधील गर्दी कमी झालेली नव्हती.
फोटो ओळी : दोन दिवस सुट्टी आणि सोमवार, मंगळवारच्या संपानंतर चार दिवसांनी सरकारी बँकांचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे सकाळपासूनच बँकांमध्ये गर्दी होती. (फोटो-१७०३२०२१-कोल-बँक) (छाया- आदित्य वेल्हाळ)