गेल्या चार महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या गावकामगार पोलीस पाटलांना अखेर प्रलंबित असणारे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचे मानधन शासनाकडून अदा करण्यात आले आहे.
गावपातळीवरील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे. पोलीस प्रशासनाच्या कामात पोलीस पाटलांना अनेक महत्त्वाची कामे व जबाबदाऱ्या पूर्ण वेळ देऊन पार पाडव्या लागतात. सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या साथीमध्ये गावागावांतील प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याबरोबरच पोलीस पाटीलही गावागावांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या कामात आघाडीवर आहेत. प्रत्येक गावातील पोलीस पाटील हा त्या गावातील स्थानिक कोरोना सामितीचा सचिव म्हणून आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहे. असे असताना याच पोलीस पाटलांना वेळेवर मानधन मिळत नाही. बहुतांशवेळा त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून पोलीस पाटलांना शासनाकडून मानधन मिळालेले नव्हते. त्यामुळे शासनाने पोलीस पाटलांना प्रलंबित असणारे मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी पोलीस पाटलांच्यातून होत होती.