संदीप बावचे -- शिरोळ -तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या आमसभेत शिरोळ तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, वाळू, नदी प्रदूषण यांसह शासकीय कामातील दिरंगाईचा पंचनामा नागरिकांनी या सभेत केला. प्रलंबित प्रश्नांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांबरोबर आमदारांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पुढील वर्षीही आमसभा होईल, असेही स्पष्ट केल्यामुळे नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करणे हेच आव्हान शासकीय अधिकाऱ्यांसमोर आहे. शिरोळ येथे ५३ वर्षांतील २० वी आमसभा गुरुवारी पार पडली. या सभेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेती, उद्योग आणि सहकाराशी नाळ जुळलेल्या तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांचा मारा सभेत अधिकच जाणवला. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न नागरिकांनी प्रभावीपणे मांडून नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्याबाबत तक्रारी करताना एखाद्या साथीच्या आजाराचा फैलाव झाल्यानंतरच आरोग्य यंत्रणा जागी होते. याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आमसभेत वाळू उपशावरून जोरदार चर्चा झाली. यंदा पाऊस कमी झाल्याने व पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार असल्याने वाळू लिलावाला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. उपसा बंदी म्हणून सभेत ठरावही करण्यात आला आहे. अनुदानित शिक्षण संस्था नियमबाह्य डोनेशन आकारतात, याबाबतही तक्रारी झाल्याने येणाऱ्या जूनमध्ये याबाबत शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते याकडेही लक्ष लागून राहिले आहे. जयसिंगपुरात पिलरवरील उड्डाणपूल करण्याची मागणी नागरिकांनी केली असली, तरी येणाऱ्या काळात त्याबाबत शासन पातळीवर कोणता निर्णय होतो हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.वीज वितरण कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आमसभेत मोठ्या प्रमाणात उमटल्या. एकूणच तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या आमसभेत संतप्त नागरिकांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यामुळे तालुक्यात शासकीय यंत्रणेचे चांगलेच वाभाडे निघाले. गैरकारभार करणाऱ्या विभागाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचा ठराव सभेत करण्यात आला आहे. एकूणच आमसभा झाली. जनतेने आपले दबलेले प्रश्न या ठिकाणी मांडले, विविध प्रश्नांबाबत ठरावही झाले, अधिकाऱ्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले आहे. आमदार उल्हास पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा केला जाईल, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व ठरावाच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या आमसभेतून अपेक्षा लागून राहिल्या आहेत. निश्चितच आमदार पाटील यांनी पुढाकार घेऊन आमसभेच्या निमित्ताने आपण जनतेबरोबर असल्याचे दाखवून दिले आहे. आता खरी गरज आहे, ती नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा होण्याची. तरच आमसभा निश्चितपणाने यशस्वी पार पडली असेच म्हणावे लागेल.गेल्या ५३ वर्षात २० वी आमसभा शिरोळ येथे झाली. याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली असलीतरी आ. उल्हास पाटील यांच्या माध्यमातून नऊ वर्षानंतर झालेली ही आमसभा निश्चितच चर्चेची ठरली आहे. सभेत विविध विषयांवर ठराव झाले आहेत, यामुळे शासकिय विभागाचे अधिकारी कोणत्या पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा करतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
आमसभेनंतर प्रतीक्षा प्रश्नांच्या सोडवणुकीची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2016 11:44 PM