कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती निवडी ३ एप्रिलला असल्याने गुढी पाडव्यानंतर पुन्हा एकदा सर्व सदस्यांना सहलीवर नेण्यासाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. जरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड ही ३७ विरुद्ध २८ मतांनी झाली असली तरीदेखील कोणताही धोका पत्करायला नेते तयार नाहीत. गत मंगळवारी (दि. २१) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी सर्जेराव पाटील यांची निवड झाली. ९ मतांनी हे दोघेही विजयी झाले; परंतु शुक्रवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, पक्षप्रतोद कार्यालय प्रवेशावेळी पक्षप्रतोद विजय भोजे अनुपस्थित राहिले. तसेच चंदगडच्या युवक क्रांती आघाडीचे दोन्ही सदस्यांनीही या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार घातला होता. त्यामुळे भाजप, शिवसेना, ताराराणी, जनसुराज्य, आवाडे गट, स्वाभिमानी, चंदगडची युवक क्रांती आघाडीच्या एकूण ३९ सदस्यांमध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात. त्याची झलक पाहावयासही मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसही स्वस्थ बसलेली नाही. त्यांनीही यातील काही नाराज सभापती निवडीच्यावेळी हाताशी लागतात का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे आपल्याकडील कुणीही सत्तारूढांच्या हाती लागू नयेत याचीही दक्षता घेण्यासाठी सदस्यांना गुढीपाडव्यानंतर पुन्हा सहलीवर पाठविण्याचीही तयारी करण्यात आली आहे. इकडे सत्तारूढ गटानेही पुन्हा सर्व गटांशी बोलण्यासाठी सोमवारचा मुहूर्त निवडला आहे. सर्व गटांशी बोलून सव्वा सव्वा वर्षांच्या अंतराने सर्वांना पदे देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गरज पडली तर सत्तारूढच्या सदस्यांनाही गुढीपाडव्यानंतर पुन्हा सहलीवर नेण्याची तयारी केली आहे, तशा सूचनाही सदस्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
गुढीपाडव्यानंतर सदस्य पुन्हा सहलीवर
By admin | Published: March 26, 2017 11:41 PM