हैदराबाद येथून दुपारी दोनच्या सुमारास निघालेले विमान कोल्हापूरमध्ये साडेतीनच्या सुमारास आले. मात्र, त्यावेळी कोल्हापुरात पाऊस सुरू असल्याने निर्माण झालेल्या खराब वातावरणामुळे हे कोल्हापूर विमानतळावर उतरविणे शक्य झाले नाही. विमानतळ परिसरातील वातावरण विमान उतरवण्यासाठी योग्य होईल याची प्रतीक्षा करत एक तास हे विमान कोल्हापूर परिसरात आकाशात घिरट्या घालत होते, पण वातावरणात फार काही बदल झाला नाही. त्यामुळे साडेचारच्या सुमारास हे विमान हैदराबादला रवाना झाले.
दरम्यान, याबाबत कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे विमान कोल्हापूर विमानतळावर उतरू शकले नाही. आम्ही प्रयत्न केले, पण वातावरण खराब असल्याने या ठिकाणी विमान उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते पुन्हा हैदराबादला परतले.