काश्मीरमध्ये ३७० कलम आणून दाखवाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राहुल गांधींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:29 PM2024-11-09T14:29:36+5:302024-11-09T14:30:57+5:30

कोल्हापूर जिल्ह्यासाठी टेक्स्टाइल पार्क मंजूर करण्याचे आश्वासन

After introducing Article 370 in Kashmir, Union Home Minister Amit Shah challenged Rahul Gandhi | काश्मीरमध्ये ३७० कलम आणून दाखवाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राहुल गांधींना आव्हान

काश्मीरमध्ये ३७० कलम आणून दाखवाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राहुल गांधींना आव्हान

इचलकरंजी : अंबाबाईच्या कोल्हापूर भूमीत राहुल गांधी यांना आव्हान देतो की, त्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम आणून दाखवावे. त्यांच्या पुढील चार पिढ्या आल्या, तरी पुन्हा ३७० कलम आणू शकणार नाहीत, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. कोल्हापूर जिल्ह्यासाठी टेक्स्टाइल पार्क मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकामध्ये भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, राहुल आवाडे, महेश जाधव यांची भाषणे झाली. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, रवींद्र माने, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, अमृत भोसले, स्वप्निल आवाडे, आदी उपस्थित होते.

शाह म्हणाले, महाराष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने चालावा की, औरंगजेबच्या मार्गाने चालावा हे तुम्हाला निश्चित करायचे आहे. तसेच, शक्तीचा अपमान करणाऱ्यांच्या सोबत आपल्याला जायचे आहे की, आईचा सन्मान करणाऱ्यांसोबत राहायचे, हे निश्चित करावे लागेल. कॉंग्रेसवाल्यांनी ७० वर्षे राम मंदिरचा विषय भिजत ठेवला. मोदी यांनी पाच वर्षांत न्यायालयीन खटला जिंकून भूमिपूजन, मंदिर निर्माण, प्राणप्रतिष्ठापना केली.

व्होट बॅंकेला घाबरून शरद पवार आणि कंपनीनी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठीही गेले नाहीत. एका बाजूला अर्थव्यवस्था देशाचा विकास याची चर्चा होते, तर दुसऱ्या बाजूला राहुल परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची चर्चा करतात. राहुल कान उघडून ऐका, भाजप आणि एनडीएचा खासदार असेपर्यंत आपणाला एससी, एसटी, ओबीसीच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही.

बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास विरोध केला. राम मंदिराला विरोध, ३७० कलम रद्दला विरोध, वक्फ कायदा, तिहेरी तलाकला विरोध करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले.

राहुल आवाडे व हातकणंगले मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांना विजयी केल्यास कोल्हापूर जिल्ह्यासाठी टेक्स्टाइल पार्क आणण्याचे काम नरेंद्र मोदी करतील. कापसाच्या शेतीपासून एक्स्पोर्टपर्यंतची वस्त्रोद्योगाची पूर्ण साखळी कोल्हापूरच्या वेगवेगळ्या तालुक्यांत बनविण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे सरकार करेल. ३७० कलम हटविल्यामुळेच राहुल गांधी काश्मीरमध्ये जाऊन बाइकवर फिरू शकतात. कोल्हापूरसाठी केंद्र सरकारने मोठी रक्कम देऊन अनेक विकासकामे केली आहेत.

सुरुवातीला शाह यांना गदा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सभेसाठी मोठी गर्दी झाली होती. मंगलधाम व नाट्यगृहाच्या बाजूला एलईडी स्क्रिनची सोय करण्यात आली होती. तेथूनच अनेकांनी सभा पाहिली.

मैं बनिया का बेटा हूं

शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात मंत्री होते. महाराष्टासाठी किती पैसे दिले?, मैं बनिया का बेटा हूं, हिसाब लाया हूं, असे म्हणत शाह यांनी केंद्र सरकारने महाराष्टसाठी सन २००४ ते २०१४ या कालावधीत एक लाख ९१ हजार काेटी रुपये दिले. आम्ही सन २०१४ ते २०२४ या कालावधीत दहा लाख १५ हजार ८९० करोड रुपये दिले, असे सांगितले.

त्या संविधानात काय होते ?

राहुल गांधी यांची एका ठिकाणी सभा होती. त्या सभेमध्ये ते संविधान हातात घेऊन बोलत होते. त्याच्या काही प्रतीही त्यांनी वाटल्या. वाटलेल्या संविधानामध्ये उघडून बघितले असता, त्याच्या आत फक्त कोरी पाने होती. एकही शब्द लिहिलेला नव्हता. फक्त वरच्या बाजूला संविधान लिहिले होते. राहुल गांधी यांनी बनावट संविधान वाटून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला आहे. संविधान हातात घेऊन त्यांनी संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली. ते पण असलेच संविधान होते का? अशी विचारणा शाह यांनी केली.

Web Title: After introducing Article 370 in Kashmir, Union Home Minister Amit Shah challenged Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.