कोल्हापूर : ‘गोकुळ’चे ज्येेष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी शुक्रवारी दुपारी संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत जुन्या आठवणींना उजाळा देताना तिघांना गहिवरून आले.
‘गोकुळ’च्या राजकारणात आनंदराव पाटील-चुयेकर, राजकुमार हत्तरकी, अरुण नरके, रवींद्र आपटे, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील अनेक वर्षे एकत्र राहिले. त्यामुळे एकमेकांबद्दल ऋणानुबंध निर्माण झाले होते. ‘गोकुळ’च्या सध्याच्या राजकीय स्थित्यंतरामध्ये विश्वास पाटील व डोंगळे यांनी विरोधी आघाडीत जाण्याची भूमिका घेतली. एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. रविंद्र आपटे यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र राजकारणापलीकडची मैत्री काय असते, हे शुक्रवारी विश्वास पाटील व डोंगळे यांनी दाखवून दिले. दोघांनीही रवींद्र आपटे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस करत ३५ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिघांनाही गहिवरून आले. यावेळी दूध उत्पादकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला, तर ‘गोकुळ’ चांगला चालवा, असे आपटे यांनी सांगितले.
फोटो ओळी :
‘गोकुळ’च्या निवडणुकीनंतर शुक्रवारी विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
(फोटो-०७०५२०२१-कोल-रविंद्र आपटे)